Heart Attack or Acidity: हार्ट अॅटॅक आहे की अॅसिडिटी, कसं ओळखाल? तज्ज्ञ डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?
Heart Attack : हार्ट अॅटॅक आहे की अॅसिडिटी, कसं ओळखाल? यासंदर्भात मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील कन्सल्टंट कार्डियाक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे यांचा विशेष लेख

छातीत होणारी वेदना ही आजकाल सर्व वयोगटांतील व्यक्तींमध्ये आढळणारी एक सामान्य तक्रार ठरली आहे. परंतु बहुतांश वेळा ही वेदना लोक अॅसिडिटी किंवा अपचन म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. छातीतली वेदना ही बऱ्याचदा साधारण अॅसिडिटीमुळे निर्माण होते, तर काही वेळा ती हृदयविकाराचा झटक्याचे हे लक्षण ठरते.
अॅसिडिटी हे पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत गेल्यामुळे उद्भवते. या स्थितीत छातीत किंवा घशात जळजळ जाणवते, तोंडात आंबट चव येते, वारंवार ढेकर येतात तसेच जेवणानंतर किंवा झोपताना अस्वस्थ वाटते. अँटासिड्स घेतल्यास हा त्रास कमी होतो आणि तीव्र धोका टळतो. अॅसिडिटी ही नियंत्रित करता येण्याजोगी व सामान्य समस्या असल्याचे डॉक्टर सांगतात.
परंतु हृदयविकाराचा झटका ही पूर्णतः वेगळी अवस्था असते. कोरोनरी धमन्यांमध्ये रक्ताची गुठळी तयार झाल्याने हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह थांबतो आणि अचानक तीव्र छातीत वेदना सुरू होते. ही वेदना छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूस दाब आल्यासारखी वाटते. कधी कधी ही वेदना हात, मान, जबडा अथवा पाठीपर्यंत पसरते. यासोबत श्वास घेण्यास त्रास होणे, घाम येणे, मळमळ व चक्कर येणे अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे हृदयविकाराची लक्षणे असून त्याकडे दुर्लक्ष करणे जीवघेणे ठरू शकते.
अॅसिडिटी व हृदयविकार यामध्ये खुप फरक आहे. अॅसिडिटीची वेदना सहसा जेवणानंतर वाढते व औषधांनी कमी होते, तर हृदयविकाराची वेदना अचानक, तीव्र व दाब आल्यासारखी असते आणि औषधांनी लगेच बरी होत नाही. शंका आल्यास स्वतःचा अंदाज बांधण्याऐवजी त्वरित वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.
हृदय व पचनसंस्थेचे आरोग्य टिकवण्यासाठी जीवनशैलीतील बदल महत्त्वाचे ठरतात. रात्री उशिरा जड व मसालेदार पदार्थांचे सेवन टाळा, कॅफिन व मद्याचे सेवन मर्यादित ठेवणे, नियमित व्यायाम करणे, वजन नियंत्रणात ठेवणे, तसेच योग व ध्यानाद्वारे ताण कमी करणे गरजेचे आहे. याशिवाय धूम्रपानाचा पूर्णपणे टाळणे आणि रक्तदाब, कोलेस्ट्रॅाल व साखरेची नियमित तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे.
अॅसिडिटी ही साधारण समस्या असून ती नियंत्रित करता येते. परंतु छातीत सतत वेदना, दाब येणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा घाम येणे यासारखी लक्षणे आढळल्यास हा हृदयविकाराचा इशारा असू शकतो. अशा वेळी विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घेणेच गरजेचे आहे. छातीतली वेदना ही केवळ अॅसिडिटी आहे असा समजून दुर्लक्ष करणे टाळा.
- डॉ. बिपीनचंद्र भामरे, कन्सल्टंट कार्डियाक सर्जन, सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबई
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
























