Salt Side Effects : काळजी घ्या! जास्त मीठ सेवन केल्याने तणाव वाढतो
Excess Salt Effects : मीठ ( Salt ) हा आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. अधिक मीठ सेवन केल्यामुळे तणावाची पातळी वाढू शकते, असे एका नवीन अभ्यासातून समोर आलं आहे.
High salt intake Increase Stress Levels : मीठ ( Salt ) हा आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. अन्नामध्ये वापरण्यात येणारे मीठ हे आरोग्यासाठी आवश्यक असते, पण याचा अतिरेक शरीराला हानी पोहोचवतो. मिठामुळे जेवणाला चव येते, पण मिठाचं अधिक सेवन आरोग्यासाठी घातक ठरु शकतं. कार्डिओव्हस्कुलर रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, शास्त्रज्ञांना आढळून आले आहे की जास्त मिठाच्या सेवनामुळे स्ट्रेस हार्मोनची पातळी 75 टक्क्यांनी वाढते. मिठाचं अधिक सेवन केल्याने हृदय, रक्तवाहिन्या आणि मूत्रपिंडांचं नुकसान होते, हे बहुतेकांना ठाऊक असेल. पण यामुळे तणावही वाढतो हे आता अभ्यासातून समोर आलं आहे.
अधिक मीठ सेवन केल्यामुळे तणावाची पातळी वाढते
एडिनबर्गच्या युनिव्हर्सिटी ऑफ कार्डिओव्हस्कुलर सायन्स सेंटरमधील रेनल फिजिओलॉजीचे प्राध्यापक मॅथ्यू बेली यांनी म्हटलं आहे की, आपण जे अन्न खातो त्यामध्ये असलेले मीठ आपले मानसिक आरोग्य कसे बदलते, हे समजून घेण्यासाठी आणि त्या दृष्टीने बदल करण्यासाठी हे संशोधन एक महत्त्वाचं पाऊल आहे. जास्त मीठ खाल्ल्याने आपले हृदय, रक्तवाहिन्या आणि मूत्रपिंडांचे नुकसान होते. तसेच आपल्या अन्नातील जास्त मीठ आपल्या मेंदूचा ताण हाताळण्याच्या पद्धतीमध्ये देखील बदल करतो, असं या अभ्यासात समोर आल्याचं बेली यांनी सांगितलं आहे.
मीठ सेवन करण्याचं योग्य प्रमाण काय?
प्रौढांनी दररोज मीठ सहा ग्रॅमपेक्षा कमी मीठ सेवन करणं हे योग्य प्रमाण आहे, पण अभ्यासानुसार प्रौढांमध्ये मिठाचे सेवन नऊ टक्के आहे. यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या होऊ शकते. शिवाय हृदयविकाराचा झटका, रक्तवहिन्यासंबंधी आजाराचा धोकाही वाढतो. याचा अभ्यास करण्यासाठी, एडिनबर्ग विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी उंदरांवर संशोधन केलं. संशोधकांना असे आढळून आले की, कमी मीठ सेवन करणाऱ्या उंदरांपेक्षा जास्त मीठ सेवन करणाऱ्या उंदारामध्ये स्ट्रेस हार्मोनची पातळी दुप्पट होती. तज्ज्ञांनी याबाबत पुढे सांगितलं आहे की, जास्त मीठ सेवन केल्याने व्यक्तीच्या स्वभावात अधिक आक्रमकता येते की नाही हे ठरवण्यासाठी पुढील अभ्यास सुरू आहेत.
जास्त मीठ सेवन केल्याने अनेक आजारांना निमंत्रण
मीठ 40 टक्के सोडियम आणि 60 टक्के क्लोराईडने बनलेले असते. सोडियम आणि क्लोराईड शरीरातील पाणी आणि खनिजांचे संतुलन राखण्याचे काम करतात. पण जर मिठाचं जास्त प्रमाणात सेवन केले गेले तर शरीराला खूप नुकसान होऊ शकतं. जास्त मिठाच्या सेवनामुळे रक्तदाब, पोटाचा कर्करोग, किडनीचे आजार, हृदयविकार, अकाली मृत्यू यांसारखे जीवघेणे आजारही होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )