Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत कमालीचा वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
![Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट Nashik Raigad Guardian Minister dispute is likely to be resolved after Chief Minister Devendra Fadnavis Delhi Visit Maharashtra Politics Marathi Ne Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/b8d62dec0561271bc7daa749a9cf0c251738231743116923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik & Raigad Guardian Minister : पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवण्याकरता आता नवी डेडलाईन समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्ली दौऱ्यावरुन आल्यानंतर हा तिढा सोडवला जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणी राज्यातल्या तिन्ही नेत्यांमध्ये बैठकीचे सत्र पाहायला मिळू शकते. सहपालकमंत्री पदासंदर्भात चाचपणी होताना दिसत आहे. मात्र, शिवसेनेकडून यासंदर्भात थेट नकार देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी अजित पवार यांच्या भेटीला पोहोचले आणि पुन्हा एकदा पालकमंत्रीपदाबाबत चर्चा रंगताना दिसली. मंत्री भरत गोगावले यांच्यासोबत आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी हे अजित पवार यांच्या मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील कार्यालयात दाखल झाले. मात्र, यावेळी त्यांची भेट जरी झाली नसली तरी येत्या दोन दिवसांत पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार असल्याचे वक्तव्य भरत गोगावले यांच्याकडून करण्यात आले.
फडणवीस दिल्ली दौऱ्यावरुन आल्यानंतर तिढा सुटणार?
मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरुन परतल्यानंतर पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल, असं सांगितलं जात होतं. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावरुन आल्यानंतर पालकमंत्रीपदाबाबतचा तिढा सोडवला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, त्याआधी नाशिक आणि रायगड जिल्ह्यासाठी सहपालकमंत्री देता येते का? याबाबत चाचपणी सुरु असतानाच शिवसेनेकडून नकार देण्यात आला आहे.
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी भाजप आग्रही
रायगडमध्ये सहपालकमंत्रीपद न घेण्यावर शिवसेना ठाम आहे तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या समर्थकांनीही पालकमंत्रीपदासाठी कंबर कसली आहे. सोबतच, भाजपची देखील नाशिकच्या पालकमंत्रीपदासंदर्भात आग्रही मागणी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या समोरच हा प्रश्न निकाली काढला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
महायुतीतील कोणता पक्ष एक पाऊल मागे घेणार?
रायगडसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील आग्रही मागणी समोर ठेवली गेली आहे. कोकणात फक्त रायगड जिल्ह्यातच राष्ट्रवादीचा पालकमंत्री होता. दरम्यान, हे पालकमंत्रिपद देखील हातातून गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोकणात एकही जिल्हा नसणार आहे. सोबतच, तटकरे कुटुंबाचं वर्चस्व मोठं असल्यानं त्यांना देखील याचा फटका बसू शकतो. अशात, राष्ट्रवादी काँग्रेसची देखील आग्रही मागणी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आल्यानंतर नेमकी काय भूमिका घेतली जाणार शिवसेनेकडून दोन पाऊलं पुढे टाकली जात असताना महायुतीतील कोणता पक्ष एक पाऊल मागे घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)