पुण्यात भोंदूबाबाने वृद्ध महिलेला फसवलं; 29 लाख रुपयांचा गंडा, पोलिसात गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील बालेवाडी परिसरात राहत असलेल्या ज्येष्ठ महिलेला डिसेंबर महिन्यात एका अनोळखी व्यक्तीने फोन केला.

पुणे : मुलीवरची काळी जादू काढतो म्हणत ज्येष्ठ महिलेला लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना पुण्यातून उघडकीस आली आहे. भोंदूबाबाने ज्येष्ठ महिलेला तब्बल 29 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. पुणे (Pune) शहरातील बालेवाडी भागात ही घटना घडली असून पीडित महिलेने याबाबत पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यावरून चतु:शृंगी पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी भिवंडीतही एका महिलेला भोंदूबाबाने फसवल्याची घटना घडली होती. त्यानंतर, संबंधित भोंदूबाबावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे महाराष्ट्र हे जादूटोणा विरोधी कायदा करणारे हे देशातील पहिले राज्य आहे. मात्र, आजही भोंदूबाबा आणि तांत्रिक व मात्रिकांच्या नादी लागून काहीजण मंडळी आपलं नुकसान करुन घेतात. काही दिवसांपूर्वी एका भोंदूबाबाच्या सांगण्यावरुन हत्येसारखा गंभीर गुन्हा देखील घडल्याचे समोर आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील बालेवाडी परिसरात राहत असलेल्या ज्येष्ठ महिलेला डिसेंबर महिन्यात एका अनोळखी व्यक्तीने फोन केला. त्यावेळी या व्यक्तीने तुमच्या घरावर दोष असल्याचे सांगितले. त्या भोंदू बाबाने संबंधित महिलेला तुमच्या घरावर वास्तुदोष आहेत, तसेच तुमच्या मुलीमधील दोष काढून देतो अशी खोटी बतावणी केली. त्यानंतर महिलेला जादूटोणा करण्याच्या जाळ्यात ओढून तिला काळी जादू काढून देतो असे सांगितले. या दोषामुळे घरावर असलेले संकट दूर करण्यासाठी काही पूजा कराव्या लागतील असे सांगून महिलेला ऑनलाइन पद्धतीने पैसे देण्यास सांगितले होते. या भोंदू बाबाच्या मागणीनुसार महिलेने आरोपीच्या बँक खात्यात वेळोवेळी 28 लाख 77 हजार रुपये जमा केले. मात्र, त्यानंतर जेव्हा त्या महिलेने त्या व्यक्तीला संपर्क करायचा प्रयत्न केला, तेव्हा समोरून काही उत्तर आले नाही. या घटनेमुळे आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट पोलिसात धाव घेतली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत पुढील तपास सुरू केला आहे.
हेही वाचा
कार अन् दुचाकीचा भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर जखमी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
