FSSAI | अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या नव्या नियमाच्या अंमलबजावणीला मुदतवाढ!
अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) नव्या नियमाच्या अंमलबजावणीला मुदतवाढ. खाद्यपदार्थांच्या खरेदी-विक्रीच्या बिलावर अनिवार्य करण्यात आला होता FSSAI परवाना क्रमांक
Food Safety and Standards Authority of India : फूड सेफ्टी आणि स्टँडर्ड्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच (FSSAI) ने आज पासून लागू होणं अपेक्षित असलेल्या नियमाला मुदतवाढ दिलीय. हा नियम होता, सर्व खाद्यपदार्थांच्या घाऊक आणि किरकोळ विक्रीच्या बिलांवर संबंधित खाद्य उत्पादनाचा FSSAI परवाना क्रमांक (FSSAI license number) नोंदवण्याविषयीचा. यावर्षी जून महिन्यात हा निर्णय जाहीर करण्यात आला होता. आज 1 ऑक्टोबरपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार होती. पण भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने Food Safety and Standards Authority of India जारी केलेल्या सुधारीत परिपत्रकानुसार या निर्णयाच्या अंमलबजावणीला 1 जानेवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय.
या मुदतवाढीनंतर पॅकेज्ड फूड उद्योगाला काहीसा दिलासा मिळाला आहे. आज दिवसभर याबाबत संभ्रमाचं वातावरण होतं. मात्र, आज दुपारी याबाबतचा सुधारीत आदेश अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून जारी झाला. हा दिलासा फक्त पॅकेज्ड फूड उद्योगाला नाही तर रेस्टॉरंट्स, खाद्यपदार्थांची किरकोळ विक्री करणारी दुकाने, मिठाई किंवा स्वीट मार्ट यांनाही लागू होता.
सध्या प्रत्येक पॅकेज्ड फूडवर FSSAI परवाना क्रमांक नोंदवलेला असतो. अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यानुसार हा परवाना क्रमांक नोंदवलेला असतो. बिस्किटे, ब्रेड, लोणची आणि शीतपेये अशा प्रकारच्या खाण्याच्या सर्व पदार्थांवर FSSAI परवाना क्रमांक नोंदवणं अनिवार्य आहे. संबंध देशभरात या नियमाची अंमलबजावणी होत आहे. यापुढे FSSAI परवाना क्रमांक सर्व होलसेल आणि रिटेल तसंच उत्पादकांनी संबंधित खाद्यपदार्थांच्या खरेदी-विक्रीच्या पावत्यांवर, इनव्हॉईस रिसीट्सवरही नोंदवणं बंधनकारक करण्यात आलं होतं. हा निर्णय 8 जून 2021 रोजी एक नोटिफिकेशन काढून प्राधिकरणाने जारी केला. यावर संबंधित खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्या होलसेलर-स्टॉकिस्ट तसंच विकत घेणाऱ्या किरकोळ दुकानदारांचाही FSSAI परवाना क्रमांक बिलावर नोंदवणं अपेक्षित होतं. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून करण्याचं प्राधिकरणाने ठरवलं होतं. मात्र, त्याला शेवटच्या क्षणी मुदतवाढ मिळाली आहे.
8 जून रोजी जाहीर केलेल्या या नोटिफिकेशननुसार, ई-वे बिल्स आणि खाद्य पदार्थांच्या राज्यांतर्गत किंवा देशांतर्गत वाहतुकीचे इलेक्ट्रॉनिक्स परवाने असलेल्या वाहतुकीला मात्र सूट देण्यात आली होती. थोडक्यात होलसेलर-स्टॉकिस्ट आणि रिटेल विक्रेता यांच्यातील खरेदी-विक्री व्यवहारांच्या पावत्यांवरच FSSAI license number चा उल्लेख करणं अनिवार्य करण्यात आलं होतं. एवढंच नाही तर हॉटेल्सची बिले, मिठाई दुकाने, केटरर्स आणि खाद्य पदार्थांची विक्री करणारी किरकोळ वाण-सामानांची विक्री करणारी किराणा दुकाने यांनाही FSSAI license number च्या कक्षेत आणण्यात आलं होतं.
आजपासून लागू होणाऱ्या या निर्णयाला ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर अशी तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )