Kidney Health Tips : किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
Kidney Health Tips : या नवीन वर्षात तुमच्या किडनीचे आरोग्य जपणे हा संकल्प करुया. तुमच्या किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊया.
Kidney Health Tips : शरीरातील कचरा आणि अतिरिक्त द्रव काढून टाकण्यात किडनी महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरातील मीठ, पाणी आणि इतर रसायनांचे प्रमाण नियंत्रित करुन संपूर्ण मूत्रप्रणालीचे कार्य सुरळीत राखण्यास मदत करते. मूत्रपिंडाचे (Kidney) कार्य करत योग्यरित्या सुरु नसल्यास एखाद्याला दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार होऊ शकतो. या नवीन वर्षात तुमच्या किडनीचे आरोग्य जपणे हा संकल्प करुया. तुमच्या किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी मिरा रोडमधील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ पुनीत भुवानिया यांनी काही महत्त्वाच्या टिप्स या लेखाच्या माध्यमातून सांगितल्या आहेत.
नवीन वर्षाचा संकल्प तर प्रत्येकजण करत असतो मात्र खूप कमी व्यक्ती हा संकल्प पूर्णत्वाकडे नेतात. यानिमित्ताने आपण आपल्या मूत्रपिंडाचे कार्य आणि त्याचे आरोग्य चांगले राखण्याची आरोग्यदायी शपथ घेऊन त्यादृष्टीने कार्य करावे. किडनी ही टाकाऊ पदार्थ, जास्तीचे पाणी आणि रक्तातील इतर अशुद्धता लघवीद्वारे फिल्टर करते. एवढेच नाही तर शरीरातील पीएच, मीठ आणि पोटॅशियमची पातळी नियंत्रित करण्यासाठी आणि हाडांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि स्नायूंच्या कार्याचे नियमन करण्यासाठी व्हिटॅमिन डी सक्रिय करण्यासाठी देखील मूत्रपिंड जबाबदार असते. परंतु, मूत्रपिंडाच्या आजाराबाबत अजूनही जागरुकतेचा अभाव आहे आणि त्यामुळेच मोठ्या संख्येने लोकांना डायलिसिसची आवश्यकता आहे. शिवाय शेवटच्या टप्प्यातील मूत्रपिंडाचा आजार असलेल्यांना किडनी प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. म्हणून, आपण स्वत:ची अत्यंत काळजी घेत असल्याचे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करा.
तुमच्या किडनीच्या आरोग्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स
1. पुरेसे पाणी प्या : भरपूर पाणी प्यायल्याने मूत्रपिंडांद्वारे विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते आणि मूत्रपिंडाच्या आजाराची शक्यता देखील कमी करते. वैद्यकीय अभ्यासानुसार, मूतखड्याचा इतिहास असलेल्या व्यक्तीने भविष्यात मूत्रपिंडात खडे तयार होऊ नये याकरता पुरेसे पाणी प्यावे.
2. धुम्रपान टाळा : धुम्रपान केल्याने रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, मूत्रपिंडातील रक्त प्रवाह मर्यादित होतो. धुम्रपान केल्याने एखाद्याला रेनल सेल कार्सिनोमा होण्याचा धोका असतो जो किडनी कर्करोगाचा एक प्रकार आहे. अशाप्रकारे, जेव्हा एखादी व्यक्ती धुम्रपान सोडते तेव्हा या कर्करोगाची शक्यता कमी होते.
3. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहा : दररोज व्यायाम करणे केवळ हृदय किंवा फुफ्फुसासाठीच नाही तर मूत्रपिंडांसाठी देखील फायदेशीर आहे. नियमित शारीरिक हालचालींमुळे वजन नियंत्रित राखण्यात आणि किडनीच्या समस्या दूर ठेवण्यास मदत होईल. व्यायामामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यात मदत होते, रक्तदाब कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. पण, याचा अर्थ असा नाही की जिममध्येच जावे लागेल. तुम्ही चालण्यापासून सुरुवात करु शकता आणि हळूहळू पोहणे, सायकलिंग, धावणे, एरोबिक्स, योग किंवा अगदी पिलेट्सही करु शकता. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे.
4. आहारात मिठाचे नियंत्रण : पॅक फूड, जंक फूडसारख्या पदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्याचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब वाढतो. तसेच जास्त प्रमाणात केले जाणारे मीठाचे सेवन तुमच्या मूत्रपिंडाचे नुकसान करते.
5. तुमची किडनीचे आरोग्य तपासा : 40 टक्के किडनी रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. त्यासाठी वेळोवेळी सीरम क्रिएटिनिन आणि लघवीचे मूल्यांकन हे तुम्हाला किडनीच्या आजारापासून दूर ठेवण्यास मदत करेल.
- डॉ पुनीत भुवानिया, नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मिरा रोड
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )