(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : बॉडी बनवण्याच्या नादात आरोग्याशी तडजोड तर करत नाही आहात ना? वाचा सविस्तर
Health Tips : जे लोक नियमितपणे प्रोटीन शेक पितात त्यांना ऍलर्जीची प्रकरणे अनेकदा दिसतात.
Health Tips : निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी आजकाल प्रत्येकजण जिमला जातात. व्यायाम करतात. मात्र, व्यायाम करत असताना आपली बॉडी वाढविण्यासाठी प्रोटीन शेक घेण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. सामान्य लोक असोत किंवा सेलिब्रिटी, प्रत्येकाने हा आपल्या दिनक्रमाचा भाग बनवला आहे. विशेषत: जे लोक जिम किंवा वर्कआउट करतात ते प्रोटीन शेक पिणं खूप आरोग्यदायी मानतात. शरीराच्या स्नायूंच्या चांगल्या आरोग्यासाठी (Health) हे आवश्यक आहे. पण, त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. अशा वेळी, जर तुम्ही त्याचा जास्त वापर करत असाल तर तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. बहुतेक लोकांना प्रोटीन शेक पिण्याचे दुष्परिणाम माहित नसतात आणि ते सेवन करत राहतात. अशा परिस्थितीत प्रोटीन शेकचे तोटे नेमके कोणते आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
ऍलर्जीचा धोका
जे लोक नियमितपणे प्रोटीन शेक पितात त्यांना ऍलर्जीचा धोका अनेकदा दिसतो. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की, तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणताही प्रोटीन शेक घेऊ नका. प्रोटीन शेक जास्त प्यायल्याने पोटदुखी, जुलाब, घशात सूज, त्वचेची जळजळ होणे, छातीत जड होणे आणि श्वासोच्छवासाचा त्रास अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
किडनी स्टोनचा धोका
प्रोटीन शेकच्या अतिसेवनाने तुम्हाला किडनी स्टोनचा देखील त्रास होऊ शकतो. प्रोटीन शेक सारख्या हाय प्रोटीन सप्लिमेंटमुळे कॅल्शियमचे प्रमाण वाढते, त्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो. हे तुमच्या यकृताला थेट नुकसान पोहोचवू शकते.
इन्सुलिनची पातळी वाढवू शकते
जर तुम्ही व्यायाम केल्यानंतर प्रोटीन शेक देखील घेत असाल, तर ते इन्सुलिनची पातळी वाढवू शकते. म्हणून अशा प्रोडक्टसचे सेवन टाळा. तसेच, प्रोटीन शेक वापरण्यापूर्वी त्यातीत घटक नीट तपासून घ्या. तरच आपण धोका टाळू शकता.
पिंपल्सची समस्या
शरीराची ताकद वाढवण्यासाठी प्रोटीनचे सेवन करणे आवश्यक आहे. कारण यामुळे नवीन पेशी तयार होतात आणि जुन्या पेशींची दुरुस्ती होते. पण, यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स देखील दिसू शकतात. तसेच, त्यात उपस्थित बायोएक्टिव्ह पेप्टाइड्स सेबमचे उत्पादन वाढवू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.