'या' गोष्टी केल्याने टळू शकतो पक्षाघाताचा धोका
पक्षाघाताचा धोका कमी करण्यासाठी आपल्याला नियमितपणे व्यायाम करणं आवश्यक आहे. कारण, शारीरिक तंदुरूस्त राहिल्यानं पक्षाघात टाळता येऊ शकतो.जागतिक पक्षाघात दिनाच्या निमित्ताने या आजाराला कसं दूर ठेवता येऊ शकतं याबाबत जाणून घ्या...
मुंबई : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पक्षाघात(स्ट्रोक) ला आमंत्रण मिळतयं. जागतिक पक्षाघात दिनाच्या निमित्ताने या आजाराला कसं दूर ठेवता येऊ शकतं, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. व्यायामाने आपणं पक्षाघाताचा धोका कमी करू शकतो. दररोज 30 मिनिटे व्यायाम करण्याची सवय लावून घ्या. यामुळे जीवनशैलीत सुधारणा होऊन पक्षाघात टाळता येऊ शकतो.
तुम्हाला चालताना किंवा कोणतीही वस्तू हातात धरताना अडचण येते का? तुम्हाला बोलताना शब्द स्पष्ट उच्चारता येत नाही का?, असं असेल तर वेळीच सावधान! ही पक्षाघात(स्ट्रोक) ची लक्षणे ही असू शकतात. जेव्हा मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गुठळी निर्माण झाल्याने अडथळे निर्माण होतात, तेव्हा मेंदूच्या त्या भागावरील नियंत्रण जाते. अगदी थोड्या काळासाठी तरी ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडला, तरी मेंदूतील पेशी मरू लागतात. एकदा प्राणवायूच्या कमतरतेमुळे पेशी मरायला लागल्या की, मेंदूच्या त्या विशिष्ट भागावरील नियंत्रण कमी होतो. त्यामुळे पक्षाघाताचा झटका येतो.
इस्केमिक स्ट्रोक दोन प्रकारचे स्ट्रोक आहेत, ज्यामध्ये मेंदूचा एक भाग रक्त प्रवाह गमावतो. तर दुसरा एक रक्तस्राव ज्यामध्ये रक्तस्त्राव रुग्णाच्या मेंदूतून होतो. पक्षाघातचं पटकन निदान होणं गरजेचं आहे. कारण पक्षाघात हे मृत्यूचे कारण ठरू शकते. याशिवाय रूग्णाला कायमस्वरूपी अपंगत्वाचा सामना करावा लागतो. तुम्हाला माहित आहे का? उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह असलेल्या लोकांना पक्षाघाताचा धोका सर्वांधिक असतो. त्याचप्रमाणे धूम्रपान केल्यामुळेही पक्षाघाताचा धोका संभवू शकतो.
पक्षाघाताचा झटका आलेल्या व्यक्तीचे आयुष्य वाचवण्यासाठी वेळेवर निदान आणि त्वरित उपचार करणं आवश्यक आहे. पक्षाघात झालेल्या प्रत्येक रूग्णावर उपचार हे त्यांच्या वैदयकीय स्थितीनुसार भिन्न असू शकतात. रूग्णांची स्थिती लक्षात घेऊन काय उपचार द्यावेत हे डॉक्टर ठरवतात. सुरूवातीच्या काळातच म्हणजे गोल्डन अवरमध्ये उपचार झाल्यास ब्रेन स्ट्रोक(पक्षाघात) चा झटका आलेला रूग्ण बरा होऊ शकतो. याशिवाय चांगली जीवनशैली सुद्धा पक्षाघाताचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.
होय हे खरंय! पक्षाघाताचा धोका कमी करण्यासाठी आपल्याला नियमितपणे व्यायाम करणं आवश्यक आहे. कारण, शारीरिक तंदुरूस्त राहिल्यानं पक्षाघात टाळता येऊ शकतो.
व्यायामाने पक्षाघाताचा धोका कसा टाळू शकतो
· दररोज व्यायाम केल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. उच्च रक्तदाब हा पक्षाघात(स्ट्रोक)चा धोका वाढवणाऱ्या घटकांपैकी एक आहे. त्यामुळे पक्षाघात होण्यापासून रोखण्यासाठी रक्तदाब नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे. इतकंच नाहीतर नियमित व्यायाम केल्यास लठ्ठपणा, कोलेस्टेरॉल आणि मधुमेह सुद्धा टाळता येऊ शकतो. अनेक सर्वेक्षणातून समोर आलं आहे की, व्यायामामुळे अनेक आजारांना दूर ठेवता येऊ शकतं.
· नियमित व्यायाम केल्याने हृदयाची कार्यक्षमता वाढते. दिवसातून कमीतकमी अर्धा तास तरी व्यायाम करावा. मुळात, आपल्याला आठवड्यातून पाच वेळा व्यायाम करणे आवश्यक आहे. आपले शरीर परवानगी देत असेल तरच आपण जोरदार व्यायाम करणे आवश्यक आहे. मात्र, अतिरिक्त व्यायाम करणं टाळावेत. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि हळूहळू व्यायामात बदल करा.
· चालणे,धावणे, एरोबिक्स करणे, पोहणे, सायकल चालविणे किंवा आपल्या आवडीच्या कोणत्याही गोष्टी करा. जे आपल्याला आपल्या स्नायू आणि हाडांचे आरोग्य बळकट करण्यास मदत करेल. अगदी घरगुती कामे करणं सुद्धा एकप्रकारचा व्यायाम आहे. नृत्य हा आणखी एक पर्याय आहे. यामुळे आपण वजन नियंत्रण ठेवू शकतो.
· पक्षाघाताचा झटका आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायामाची निवड करा. आपण एक फिटनेस ट्रेनर सुद्धा ठेवू शकता. जो आपल्याला योग्यपद्धतीने व्यायाम करणं मदत करू शकतो.
· नियमित व्यायामाबरोबरच संतुलित आहार घेणंही आवश्यक आहे. याशिवाय धुम्रपान व मद्यपानाचे व्यसन करणं टाळावेत. कारण पक्षाघातामुळे जीवघेणे परिणाम रूग्णाला सहन करावे लागते. यासाठी पक्षाघाताबद्दल समाजात जागरूकता निर्माण केली पाहिजे. बऱ्याच लोकांना पक्षाघाताबद्दल माहिती नसते. त्यामुळे लोकांना याबद्दल माहिती देणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून पक्षाघात वेळीच लक्षात आल्यास रूग्णावर तातडीने उपचार होऊन तो बरा होऊ शकतो.