Job In Israel : भारतीय बांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये रोजगाराची संधी, दोन लाखांपर्यंत वेतन मिळणार
Job Opportunity In Israel : दहावी उत्तीर्ण असलेल्या आणि 25 ते 45 वयोगटातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांना इस्त्रायलमध्ये मोठी संधी असून त्यासाठी 1.40 लाख ते दोन लाखांपर्यंत वेतन मिळणार आहे.
मुंबई : बांधकाम कामगारांना (Indian construction workers) इस्राईलमध्ये रोजगाराची संधी मिळणार असल्याची घोषणा राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. त्यासाठी शासनाकडून बांधकाम कामगारांना संपूर्ण मार्गदर्शन केले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यासाठी 25 ते 45 वयोगटातील कामगारांनी जिल्हास्तरावर जिल्हा कौशल्य, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन मंत्री लोढा यांनी केलं आहे.
इस्राईलमध्ये रोजगाराच्या संधींसाठी कुशल बांधकाम कामगारांकडून अर्ज मागविण्याची कार्यवाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून सुरू झाली आहे. इस्रायलमधील बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात काम मिळावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करेल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
मंत्री लोढा म्हणाले की, केंद्र सरकारच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट (NSDC) इंटरनॅशनल आणि राज्य शासनाच्या सहकार्याने बांधकाम कामगारांसाठी इस्राईलमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. शासनाकडून सर्वोतोपरी या बांधकाम कामगारांना मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हा कौशल्य, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे इच्छुकांनी संपर्क साधावा.
फ्रेमवर्क/ शटरिंग कारपेंटर, बार बेंडिंग मेसन, सिरेमिक टाइलिंग मेसन, प्लास्टरिंग मेसन इत्यादी विविध ट्रेडसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. निवडलेल्या व्यक्तीना इस्राईलमधील इमारत बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात काम मिळावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. या नोकरीमुळे प्रत्येक कामगाराला 1.4 लाख रुपयांपासून ते 2 लाखांपर्यंत दरमहा वेतन मिळेल. दरमहा 16,000 रुपये अतिरिक्त ठेव निधी ठेवावा लागेल.
या पदासाठी साठी 25 ते 45 वर्षे वयोगटातील अर्जदार नोकरीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराने किमान 10 वी उत्तीर्ण केलेली असावी. कामगाराला किमान एक वर्ष ते कमाल पाच वर्षांच्या नोकरीसाठी अनिवार्य करारावर स्वाक्षरी करावी लागेल. तसेच त्यांना कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. त्याचप्रमाणे इस्राईलमध्ये पूर्वीचा रोजगाराचा इतिहास नसावा. अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने यापूर्वी इस्राईलमध्ये काम केलेले नसावे.
अधिक माहितीसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/mic या संकेतस्थळावर भेट द्यावी आणि 8291662920 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून करण्यात आले आहे.
ही बातमी वाचा: