'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
Jitendra Awhad On Pratap Sarnaik: कष्टाळू माणसाला जेव्हा यश मिळतं तेव्हा यशाची किंमत कळते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
Jitendra Awhad On Pratap Sarnaik: मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक ( Pratap Sarnaik) यांनी संस्कृती आर्ट फेस्टिवल आयोजन केले होते. या फेस्टिवलच्या मंचावर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उपस्थिती लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आमची गेल्या 35 वर्षांपासूनची मैत्री असल्याचं सांगितलं. तसेच आम्ही आजही एकत्र राहण्याचं कारण म्हणजे माऊली म्हणजेच मिसेस सरनाईक आहे, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
माझे जवळचे मित्र म्हणून आम्ही 35 वर्ष एकत्र आहोत. कधी लांब गेलो..कधी जवळ आलो..कधी लांब गेलो..लांब एकदाच गेलो. मात्र एकत्रही राहिलो. जवळ राहण्याचं प्रमुख कारण म्हणजे ही माऊली (मिसेस सरनाईक) ते अतिशय उत्तम स्वयंपाक बनवतातं यांच्या हातची कोणी मच्छी खाईल तो कधी विसरणार नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. प्रताप सरनाईक खूप संघर्ष करून पुढे आले. काहीच लोकांना माहीत असेल आमलेट पावची गाडी लावून आज हे लेम्बोर्गिनी गाडीचे ते मालक आहे. अशा कष्टाळू माणसाला जेव्हा यश मिळतं तेव्हा यशाची किंमत कळते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
प्रताप सरनाईकांना मंत्रिपद मिळालं. माझ्या वैयक्तिक दृष्टीने हे मंत्रिपद मिळाल्याने ही आनंदाची बाब आहे. आमच्यानंतर आले ते खूप पुढे निघाले. मला कुठलाही रोलमध्ये फिरायची सवय आहे. मी ओपनिंगला पण जाऊ शकतो आणि बॉलिंग देखील टाकू शकतो. सध्या मी बॉलिंग टाकतोय मागच्या महिन्याभरात..कुठल्याही गेम मध्ये आपण फिट बसू..एवढा आपलं काम आहे. स्वभाव आहे. कुठेही गेलो तर फिट बसेल, असं विधान जितेंद्र आव्हाडांनी केलं. तुम्हाला कल्पना नसेल पण मी पहिल्यांदा या कार्यक्रमाला आलो. प्रताप सरनाईकांनी मला आमंत्रित केलं. त्यांचे मनापासून आभार मानतो, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या- जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड यांनी प्रताप सरनाईक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळवून घेण्याचा मित्रत्वाचा सल्ला दिला. वेगवेगळे भ्रष्टाचार बाहेर निघत आहेत. काही लोकांचे ऑर्डर ला स्टे ऑर्डर मिळतात. तू कुठल्याही लफड्यांमध्ये जाऊ नको. तू आणि देवेंद्र फडणवीस असा मार्गे स्ट्रेट करून ठेव. सगळं व्यवस्थित होईल, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.