Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छ. संभाजीनगरमध्ये तलवारी घेऊन पाठलाग, भररस्त्यात एकावर वार, हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराची दहशत
Chhatrapati Sambhaji Nagar news: छत्रपती संभाजीनगरच्या शहागंज परिसरात सोमवारी दुपारी एक थरारक घटना घडली. या घटनेत एका सराईत गुन्हेगाराने फळविक्रेत्यावर तलवारीने वार केले.
छत्रपती संभाजीनगर: राज्यभरात पुण्यातील कोयता गँग आणि वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा चर्चेत असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सराईत गुन्हेगाराने भरदिवसा हातात तलवार (Sword) घेऊन एका व्यक्तीचा पाठलाग केल्याने शहागंज परिसरात दहशत निर्माण झाली आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. शहागंजमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख रईस याची ही तलवारबाजी चर्चेचा विषय ठरत आहे. अशाप्रकारच्या गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी आता पोलीस प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, शेख रईस हा भररस्त्यावर नंगी तलवार घेऊन एका व्यक्तीचा पाठलाग करत होता. हातात तलवार घेऊन या रेकॉर्डवरील आरोपीने दहशत निर्माण केली. शेखर रईस याने शहागंजमध्ये भररस्त्यावर एकाचा पाठलाग करत त्याच्यावर वार केला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोमवारी दुपारी सव्वाचार वाजता ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपीला अटक केली.
शेख रईस उर्फ भुऱ्या शेख अनिस असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी सोहेल पटेल ऊर्फ कांगारू बशीर पटेल हा फळविक्रेता आहे. रईस आणि सोहेल यांच्यात जुना वाद आहे. सोमवारी दुपारी त्याने रईस शेख याला मस्करीमध्ये शिवी दिली. त्याचा राग आल्याने रईस काहीवेळासाठी कुठेतरी निघून गेला. पुन्हा दहा मिनिटाने तो तलवार घेऊन परत आला. त्याने सोहेलच्या डाव्या पायावर, पाठीवर वार करुन त्याला जखमी केले. दरम्यान, रईस हातात तलवार घेऊन राजाबाजार मंदिर समोरून मारण्यासाठी पळत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. या घटनेमुळे आजुबाजूने जाणाऱ्या लोकांमध्ये तलवार पाहून दहशत पसरली होती. पोलिसांनी काही तासात आरोपी रईसला अटक केली. पोलिसांनी तलवार जप्त केली आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात तरुणीची हत्या
काही दिवसांपूर्वी पुण्याच्या विमाननगर परिसरात असणाऱ्या आयटी पार्कमध्ये शुभदा कोदारे या तरुणीची हत्या करण्यात आली होती. तिच्याच कंपनीतील सहकारी कृष्णा कनोजा याने तिला चाकूने वार करुन ठार मारले होते. कृष्णाने कंपनीच्या आवारातच सगळ्यांच्यादेखत शुभदावर चाकूने वार केले होते. यावेळी सगळ्यांनी बघ्याची भूमिका घेतली. कृष्णा कनोजा याने शुभदाच्या हातावर चाकूचे वार केले होते. बराचवेळ ती खाली बसून होते. यादरम्यान अतिरक्तस्राव झाल्याने रुग्णालयात नेण्यापूर्वीच शुभदाचा मृत्यू झाला.
आणखी वाचा