'भारत बचाओ' रॅलीत राहुल गांधींचा हल्लाबोल, "माझं नाव राहुल सावरकर नाही, मी माफी मागणार नाही"
देशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांवर बोलताना राहुल गांधी यांनी देशाचा उल्लेख 'रेप इन इंडिया' केला होता. या वक्तव्यावरून राहुल गांधी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली होती. मात्र मी माफी मागणार नाही. "राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे", असं राहुल गांधींनी म्हटलं.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या 'भारत बचाओ' रॅलीत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. देशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांवर बोलताना राहुल गांधी यांनी देशाचा उल्लेख 'रेप इन इंडिया' केला होता. या वक्तव्यावरून राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली होती. त्यावर "मी माफी मागणार नाही. मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे", असं राहुल गांधींनी म्हटलं. मी मरेन मात्र माफी मागणार नाही. नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागायला हवी. मोदींचे असिस्टंट अमित शाह यांनी देशाची माफी मागायला हवी. या देशाची शक्ती, अर्थव्यवस्था संपूर्ण जग पाहायचा. मात्र आज देशात काय होत आहे, असा सवाल राहुल गांधींनी विचारला.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, महिलांवरील अत्याचार, देशाची ढासळती अर्थव्यवस्था आणि अन्य मुद्द्यावरुन राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला. काळ्या पैशांचं नाव पुढे करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खोटं बोलून देशात नोटबंदी लागू केली. नोटबंदीची झळ आजही देशाला बसत आहे. त्यानंतर मोदी सरकारने देशाच जीएसटी म्हणजे 'गब्बर सिंह टॅक्स' लागू केला आणि त्यामुळेच आज देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे, अशी टीका राहुलं गांधींनी केली. खरं पाहिलं तर देशाचा जीडीपी 2.5 टक्के आहे. मात्र मोदी सरकार खोटं बोलत आहे. मोदी सरकारने देशातील मोठ्या उद्योगपतींचं कर्ज माफ केलं आणि सामान्य जनतेचा पैसा हिसकावून घेतला. देशाची अर्थव्यवस्था नष्ट केली जात आहे, अशा शब्दात राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन मोदींनी पूर्वोत्तर राज्याना जाळलं, आसाम पेटला आहे. मोदी सरकारने देशभर हिंसा पसरवली आहे. मोदी देशात धर्माच्या नावाखाली भांडणं लावत आहेत. जे देशाच्या शत्रूने केलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं आहे. मोदींनी मनरेगाचा पैसा हिसकावून घेतला आहे. आज देशातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. बेरोजगारी वाढत आहे, अर्थव्यवस्था ढासळली आहे, अशा परिस्थितीत मोदींनी देशाची माफी मागायला हवी, अशी मागणी राहुल गांधींनी केली.
दिल्लीतील रामलीला मैदानात काँग्रेसने 'भारत बचाओ' रॅलीचं आयोजन केलं होतं. .यावेळी देशभरातून काँग्रेस कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि प्रियंका गांधी यांच्यासह अन्य दिग्गज नेते सहभागी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
