एक्स्प्लोर
'देवमाणसा'च्या आगमनामुळे 'रात्रीस खेळ' होणार बंद!
रात्रीस खेळ चाले ही मालिका 29 ऑगस्टला निरोप घेणार आहे. त्या जागी 31 तारखेपासून देवमाणूस ही नवी मालिका येणार आहे.

मुंबई: लॉकडाऊनमध्येच टीव्हीच्या चित्रिकरणाची परवानगी देण्यात आली. अटीशर्तींसहं चित्रिकरण सुरू झालं. काही मालिकांनी आपले ट्रॅक बदलले. काही मालिकांनी आपल्या व्यक्तिरेखांना कात्री लावली.. असं बरंच काही सुरू होतं. अनेक वाहिन्यांनी नव्या मालिकांची घोषणाही केली आहे. यात गणपती बाप्पावरची मालिका स्टार प्रवाहने जाहीर केली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं... ही मालिकाही येते आहे. त्यात आता झी मराठीनेही नव्या मालिकेची घोषणा केली आहे. ही मालिका आहे देवमाणूस. त्या मालिकेची वेळ असणार आहे रात्री साडेदहाची. म्हणजे सध्या चालू असलेली साडेदहाची मालिका बंद होणार आहे. ही मालिका आहे रात्रीस खेळ चाले.
सिंधुगुर्गातल्या आकेरी इथे जवळपास वर्षभरापासून रात्रीस खेळ चाले ही मालिका सुरू आहे. या मालिकेचा दुसरा सीझन लोकांना आवडला. त्यातलं शेवंता आणि आण्णा नाईकांचं कॉम्बिनेशन लोकांना खूप आवडलं. शिवाय, वच्छी, माधव, दत्ता, पांडू या व्यक्तिरेखाही घराघरात ओळखल्या जाऊ लागल्या. आता मात्र ही मालिका 29 ऑगस्टला निरोप घेणार आहे. त्या जागी 31 तारखेपासून देवमाणूस ही नवी मालिका येणार आहे.
देवमाणूस ही मालिकाही थ्रिलर असणार आहे. विशेष बाब अशी की लागीरं झालं जी.. या मालिकेत भैय्यासाहेब साकारलेला किरण गायकवाड या मालिकेत मुख्य भूमिकेत असणार आहे. तर त्याच्या जोडीला असलेली नायिका ही लागिर झालं जी मधलीच शीतलीच्या काकीची भूमिका करणारी शिवानी घाटगे ही असणार आहे. त्याची रीतसर घोषणा रात्रीस खेळ चाले या मालिकेचा शेवटच्या दिवशी होणार आहे. 29 ऑगस्टला ही मालिका आपला निरोप घेणार आहे. अर्थातच या मालिकेची सुरूवात जिथून झाली होती, त्याच वळणावर.. त्याच टप्प्यावर ही मालिका विराम घेईल. यात आण्णा जगाचा निरोप घेतील. पण तो कसा घेतील हे बघणं रंजक असणार आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























