Jar Tarchi Goshta : प्रिया बापट-उमेश कामतच्या ‘जर तर ची गोष्ट’चा दणक्यात शुभारंभ; पहिल्याच प्रयोगाला झळकली ‘हाऊसफुल्ल’ची पाटी
Jar Tarchi Goshta : 'जर तर ची गोष्ट' या नाटकाचा दणक्यात शुभारंभाचा प्रयोग पार पडला आहे.
Jar Tarchi Goshta : सुमारे एका दशकानंतर मराठी इंडस्ट्रीतील ‘क्यूट आणि परफेक्ट कपल’ म्हणजेच प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) रंगभूमीवर एकत्र आले आहेत. या कपलची पडद्यामागील केमिस्ट्री जितकी त्यांच्या चाहत्यांना आवडते तितकीच रंगभूमीवर पाहायलाही आवडते. हीच सुंदर केमिस्ट्री नाट्यरसिकांना आता नाट्यगृहात पाहायला मिळणार आहे.प्रिया बापट सादर करत असलेल्या ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाचा नुकताच शुभारंभ झाला असून पहिल्याच प्रयोगासाठी ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला आहे.
अद्वैत दादरकर (Adwait Dadarkar), रणजित पाटील (Ranjit Patil) दिग्दर्शित यांनी या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. इरावती कर्णिक लिखित या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत यांच्यासह पल्लवी अजय (Pallavi Ajay), आशुतोष गोखले (Aashutosh Gokhale) यांच्याही प्रमुख भूमिका आहेत तर नंदू कदम (Nandu Kadam) या नाटकाचे निर्माते आहेत.
View this post on Instagram
शुभारंभाच्या प्रयोगाविषयी निर्माते नंदू कदम म्हणाले," ॲानलाईन आणि ऑफलाईन तिकीट विक्री सुरू झाल्यापासूनच नाट्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. शुभारंभाचा प्रयोग दणक्यात पार पडल्यामुळे खूप आनंद आहे. मला खात्री आहे, हे नाटक प्रेक्षकांना निश्चितच आवडेल. तिकीट न मिळाल्याने काही प्रेक्षक नाराजही झाले आहेत, मात्र त्यांच्यासाठी आम्ही लवकरच आणखी प्रयोग सादर करू. सर्व वयोगटाला आवडेल, असे हे कौटुंबिक नाटक आहे".
'जर तर ची गोष्ट' हे नाटक आजच्या तरुणांचं : उमेश कामत
'जर तर ची गोष्ट' या नाटकाबद्दल एबीपी माझाशी बोलताना उमेश कामत म्हणाला,"जर तर ची गोष्ट' हे नाटक आजच्या तरुणांचं आहे. त्यांचे विचार, रिलेशनशिपकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन अशा अनेक गोष्टींवर भाष्य करणारं आजच्या तरुणांना रिप्रेझेंट करणारं हे नाटक आहे".
रंगमंचावर उमेशसोबत एकत्र काम करण्याबाबत प्रिया बापट म्हणाली,'जर तर ची गोष्ट' हे माझं दुसरं व्यावसायिक नाटक आहे. आपलंच प्रॉडक्शन असलेल्या नाटकात अभिनय करायला मिळणं आणि तेही आपल्या आवडत्या सहकलाकारासोबत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. हा माझा हट्ट आणि इच्छा होती की माझं पुढील नाटकही उमेशसोबतच असावे. यासाठी आम्ही फार वाट पाहिली. अखेर ही इच्छा पूर्ण झाली आहे. अतिशय प्रेमाची आणि हक्काची माणसं या नाटकाशी जोडली गेली आहेत".
संबंधित बातम्या