लॉकडाऊननंतर 'अनन्या' नाटक होणार आता 'अनलॉक'
अनन्या नाटक लॉकडाऊननंतर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनन्याचा लॉकडाऊन नंतर होणारा शुभारंभाचा प्रयोग 4 एप्रिल रोजी दुपारी साडे चार वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये पार पडणार आहे.
![लॉकडाऊननंतर 'अनन्या' नाटक होणार आता 'अनलॉक' ananya marathi drama reopen after lockdown लॉकडाऊननंतर 'अनन्या' नाटक होणार आता 'अनलॉक'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/28/069b833c910f03f12ee01254e753388c_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : नाटक आणि प्रेक्षकांमधील दुवा असणारी रंगभूमी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शांत होती. मागील मार्च महिन्यात अनेक गोष्टींवर बंधने आली, त्यात रंगभूमीचादेखील समावेश होता. काही कालावधीनंतर परिस्थिती पूर्वपदावर येत गेली. 5 नोव्हेंबर पासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे उघडली. मात्र कोरोनाच्या भितीने या रंगमंचाला बहरायला पुरेसा वेळ लागला. सध्या अनेक नाटकांचे प्रयोग पन्नास टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगत आहेत.
लॉकडाऊन आधी अनेक नाटकांचे जोरदार प्रयोग सुरू होते. त्यात 'अनन्या' नाटकाचादेखील समावेश होता. सुयोग, ऐश्वर्या, आर्य निर्मित 'अनन्या' हे नाटक आहे. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे. या नाटकात अभिनेत्री ऋतुजा बागवे मुख्य भूमिकेत आहे. तर प्रमोद पवार, विशाल मोरे, अनघा भगरे, करण बेंद्रे आणि सिद्धार्थ बोडके सहाय्यक भूमिकेत आहेत. अनन्याचे लॉकडाऊन आधी 297 प्रयोग प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादात पार पडले होते. अनन्याचा लॉकडाऊन नंतर होणारा शुभारंभाचा प्रयोग 4 एप्रिल रोजी दुपारी साडे चार वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये पार पडणार आहे.
अनन्या नाटक रंगभूमीवर येण्याआधी या नाटकाची सलग एक महिना तालीम झाली होती. पण सध्या वाढत्या कोरोनामुळे नाटकाची तालीम झूमवर होत आहे. पण प्रयोगाआधी पाच दिवस प्रत्यक्ष भेटून तालीम आणि रंगीत तालीम होणार आहे. प्रयोगादरम्यान कोरोनासंबंधीत सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. प्रयोगानंतर प्रेक्षकांना कलाकारांना पूर्वीसारखं भेटता येणार नाही. मास्क लावणे बंधनकारक असेल, हात सॅनिटाइज करूनच प्रेक्षकांना नाट्यगृहात प्रवेश करता येईल, पन्नास टक्के प्रेक्षकांची उपस्थिती असेल, सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यात येईल. ऋतुजा बागवे म्हणाली की, "मागील वर्षी कोरोनामुळे 300 वा प्रयोग रद्द झाला होता, आता एक वर्षांनी आम्ही परत प्रयोगांना सुरूवात करणार आहोत, तो 298 वा प्रयोग असला तरी तो आमच्यासाठी पहिलाच असणार आहे".
ऋतुजा बागवेची सध्या 'चंद्र आहे साक्षीला' ही मालिकादेखील सुरू आहे. मालिकेच्या सेटवर जसा वेळ मिळेल तसं ऋतुजा नियमित व्यायाम करते आहे. तसेच प्रयोगात तिला ज्या वस्तू पायाने उचलायच्या आहेत त्या वस्तू ती मालिकेच्या सेटवरच फावल्या वेळेत उचलून पाहत आहे. ऋतुला बागवेने सध्या झूमवर सुरू असणाऱ्या तालमीतला किस्सा शेअर केरताना सांगितले की, "पहिल्या तालमीत कुणाला काही आठवत नव्हतं. एक वाक्य बोलून झालं की फक्त एकमेकांकडे बघत होतो. स्वत:ची सोडून इतरांची वाक्य प्रत्येकाला पाठ होती. असं करत करत पूर्ण चकरी पार पाडली. आणि 2-3 दिवसातच सर्वांचे संवाद पाठ झाले. एक वर्षानंतर प्रयोग करताना हीच गंमत होती की, पाटी कोरी होती. पुन्हा नव्याने प्रयोग करताना खूप उत्सूक आहे. अनन्यासारख्या नाटकाचे प्रयोग मला खूप करायचे आहेत".
नाटकाचे दिग्दर्शक प्रताप फड म्हणाले की, "अनन्याचा कोरोनानंतरचा प्रयोग हा एक वर्षांनी होणार आहे, त्यामुळे नक्कीच खास असणार आहे. तसेच लवकरच आम्ही 300 प्रयोगांचा पल्ला पार पाडतो आहोत. नव्याने प्रयोग सुरू होण्याचा खूप आनंद आहे, खूप उत्सूकता आहे".
अनन्या चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
अनन्या चित्रपट 31 जुलै 2020 रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ते शक्य झालं नाही. चित्रपट तयार आहे. लवकरच योग्य वेळ, योग्य तारीख बघून प्रदर्शित होणार आहे. प्रताप फड म्हणाले की, "अनन्या नाटकाला प्रेक्षकांनी जितकं प्रेम दिलं तितकच प्रेम त्यांनी चित्रपटालाही द्यावं, लवकरच चित्रपटाची तारीख निर्माते जाहीर करतील."
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)