एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन
कमांडर आणि हॅलो इन्स्पेक्टर या मालिकांनी रमेश भाटकर यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. याशिवाय दामिनी, बंदिनी, युगंधरा या कार्यक्रमांतही ते दिसले. ते नुकतेच माझे पती सौभाग्यवती या मालिकेतही झळकले होते.
मुंबई : मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन झालं. ते 69 वर्षांचे होते. मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश भाटकर यांना कर्करोग झाला होता. त्यावर एलिझाबेथ रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
कॅन्सरचं निदान झाल्यानंतर आपल्याकडे अवघे काही दिवस शिल्लक असल्याचं त्यांना कळलं. त्यामुळे शेवटचे दिवस काम करायचं या इराद्याने पुन्हा एकदा ते मोठ्या पडद्यावर झळकले होते. नुकत्याच आलेल्या 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटात त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची व्यक्तिरेखा साकारली होती.
रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम आहे. त्यांनी रंगभूमीवरुनच त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात केली. अश्रूंची झाली फुले हे त्यांचं नाटक तर प्रचंड गाजलं होतं. तसंच त्यांची केव्हा तरी पहाटे, अखेर तू येशीलच, राहू केतू, मुक्ता यांसारखी अनेक नाटकं गाजली आहेत.
1977 मध्ये "चांदोबा चांदोबा भागलास का" या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अष्टविनायक, दुनिया करी सलाम, आपली माणसं यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी माहेरची साडी, सवत माझी लाडकी असे एकाहून एक हिट चित्रपट दिले. त्यांनी 90 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक हिंदी चित्रपटांमध्येही ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.
मात्र कमांडर आणि हॅलो इन्स्पेक्टर या मालिकांनी रमेश भाटकर यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. याशिवाय दामिनी, बंदिनी, युगंधरा या कार्यक्रमांतही ते दिसले. ते नुकतेच माझे पती सौभाग्यवती या मालिकेतही झळकले होते.
रमेश भाटकर हे प्रसिद्ध गायक संगीतकार स्नेहल वासूदेव भाटकर यांचे सुपुत्र आहेत. रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदूला भाटकर या हायकोर्टाच्या न्यायाधीश असून त्यांना हर्षवर्धन नावाचा एक मुलगा आहे. त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1949 रोजी झाला होता. त्यांना आणखी दोन भावंडं असून त्यांचं बालपण मुंबईत गेलं. कॉलेज जीवनात ते स्विमिंग चॅम्पियन होते. तसंच खो-खो या खेळातही ते पारंगत होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
महाराष्ट्र
करमणूक
क्रीडा
Advertisement