एक्स्प्लोर
सितारा देवी यांना गुगलचा डूडलद्वारे सलाम!
रवींद्रनाथ टागोर यांनी सितारा देवी यांना ‘नृत्य सम्राज्ञी’ अशी उपाधी दिली होती. त्यावरुन सितारा देवी यांच्या नृत्यकलेची कल्पना येऊ शकते.
मुंबई: कथ्थकच्या सच्च्या उपासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सितारा देवी यांना गुगलने डूडलद्वारे सलामी दिली आहे. सितारा देवी यांच्या जयंती निमित्त गुगलने त्यांचं डूडल साकारलं आहे.
रवींद्रनाथ टागोर यांनी सितारा देवी यांना ‘नृत्य सम्राज्ञी’ अशी उपाधी दिली होती. त्यावरुन सितारा देवी यांच्या नृत्यकलेची कल्पना येऊ शकते.
वयाच्या सोळाव्या वर्षी कथ्थकसारख्या नृत्यप्रकारात, सितारा देवी यांची वीजेसारखी लखाकणारी कला पाहून, रवींद्रनाथ टागोर भारावून गेले होते. त्यामुळेच त्यांनी सितारा देवी यांना ‘नृत्य सम्राज्ञी’ अशी उपाधी दिली होती.
सितारा देवी यांचा अल्पपरिचय
सितारा देवी यांचं मूळ नाव धनलक्ष्मी होतं. सितारा देवी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1920 रोजी कोलाकातामधील नर्तक सुखदेव महारा यांच्या घराण्यात झाला. सितारा देवी 11 वर्षांच्या असताना त्यांचं कुटुंब मुंबईत वास्तव्यास आलं.
सितारा देवी यांना संगीत नाटक अकादमी, पद्मश्री आणि कालिदास सन्मान यांसारख्या प्रतिष्ठीत पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.
बालपणी त्यांनी काही सिनेमांमध्ये नृत्यही केलं होतं. सितारा देवी यांना 1973 मध्ये पद्मश्री पुरस्कार जाहीर केला होता, मात्र त्यांनी तो नाकारला. भारत सरकारला माझ्या योगदानाचं महत्त्व नाही. हा माझ्यासाठी सन्मान नाही तर अपमान आहे. मला भारतरत्न मिळायला हवं, असं म्हणत त्यांनी पुरस्कार नाकारला होता.
सितारा देवी यांनी बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना नृत्याचं प्रशिक्षण दिलं. मधुबाला, रेखा, माला सिन्हा आणि काजोल यांसारख्या अभिनेत्रींनी त्यांच्याकडून कथ्थकचं शिक्षण घेतलं होतं.
सितारा देवी यांनी अनेक सिनेमांमध्ये कामही केलं होतं. शहर का जादू (1934), जजमेंट ऑफ अल्लाह (1935), नगीना, बागबान, वतन (1938), मेरी आंखें (1939) होली, पागल, स्वामी (1941), रोटी (1942), चांद (1944), लेख (1949), हलचल (1950) आणि मदर इंडिया (1957) या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होतं.
वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास
सितारा देवी यांचं वयाच्या 94 व्या वर्षी मुंबईच्या जसलोक रुग्णालयात निधन झालं. सितारा देवी यांना पोटदुखीच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याचवेळी उपचारादरम्यान 25 नोव्हेंबर 2014 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement