(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sidharth Shukla Death : सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट; कोणावरही संशय नसल्याचं कुटुंबियांचं स्पष्टीकरण
सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदनानंतर नेमकं कारण स्पष्ट होईल. आपल्याला कोणावरही संशय नसल्याचं सिद्धार्थच्या कुंटुंबियांनी स्पष्ट केलं आहे. (Sidharth Shukla Death).
मुंबई : बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदनानंतर ते स्पष्ट होईल. पण त्याचे अकाली निधन म्हणजे आत्महत्या आहे का, किंवा कोणी त्याचा खून केला का अशी चर्चा आता रंगली आहे. पण या चर्चांना पूर्णविराम देताना, आपल्याला कोणावरही संशय नसल्याचं सिद्धार्थच्या कुटुंबियांनी स्पष्ट केलंय.
पोलिसांच्या सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, सिद्धार्थच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूबद्दल अद्याप कोणावरही संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे शवविच्छेदनानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. सिद्धार्थच्या मृतदेहाचे कूपर हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन होणार आहे.
कूपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सकाळी 10.30 वाजता सिद्धार्थला 'डेथ बिफ़ोर अरायव्हल' घोषित केलं होतं. त्याचवेळी ओशिविरा पोलिसांचं एक पथक सिद्धार्थ शुक्लाच्या घरी तपासासाठी पोहोचलं होतं.
बिग बॉसच्या तेराव्या सीझनचा विजेता म्हणून सिद्धार्थ नावारुपाला आला. खतरो के खिलाडी, फिअर फॅक्टर या रिअॅलिटी शोमधून सिद्धार्थ झळकला होता. याव्यतिरिक्त बॉलिवूडमध्येही सिद्धार्थ झळकला होता. हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटात त्यानं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. सिद्धार्थ शुक्लाला खरी ओळख टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका बालिका वधूमधून मिळाली. त्यानंतर सिद्धार्थनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. दिल से दिल तक मालिकेतही तो झळकला होता.
बिग बॉस 13 मुळे सिद्धार्थ पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आला. त्यांची आणि पंजाबी अभिनेत्री शहनाज गिल या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. दोघ काही दिवसांपूर्वी एकत्र बिग बॉस ओटीटीवर दिसून आले होते.
सिद्धार्थच्या निधनाची बातमी मिळताच मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :