'अलबत्या गलबत्या' नाटकाच्या विश्वविक्रमी प्रयोगांना दिमाखात सुरूवात
शिवाजी मंदिरमध्ये अलबत्या गलबत्या या नाटकाचे सलग पाच प्रयोग होणार आहेत. त्या प्रयोगांना सकाळी साडेसात वाजता सुरूवात झाली.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मराठी नाट्यरसिकांचं लक्ष आजच्या दिवसाकडे लागलं आहे. कारण आज म्हणजे, स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवाजी मंदिरमध्ये अलबत्या गलबत्या या नाटकाचे सलग पाच प्रयोग होणार आहेत. त्या प्रयोगांना सकाळी साडेसात वाजता सुरूवात झाली. विशेष म्हणजे सकाळचा प्रयोग असूनही अबालवृद्धांनी हा प्रयोग हाऊसफुल्ल केला.
रत्नाकर मतकरी लिखित चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित या नाटकाचा आज 96वा प्रयोग झाला. संध्याकाळी साडेसात वाजता पाचवा प्रयोग सादर होईल तो असेल एकूण 100 वा प्रयोग आहे. वैभव मांगले यांची मुख्य भूमिका असलेल्या या नाटकाकडे सर्वांचं लक्ष आहे. यासाठी शिवाजी मंदिरचं प्रवेशद्वार विशेष सजवण्यात आलं आहे. नाटकातील चिंची चेटकिणीचा मोठा कटआऊट दारापाशीच लावण्यात आला आहे. सकाळी सनई चौघड्यांच्या सूरात प्रेक्षकांचे स्वागत करण्यात आलं. कलाकारांना कोणताही त्रास झाला तर सायन हॉस्पिटलचे डॉक्टर तैनात ठेवण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, अभिनेते उमेश कामत आणि प्रिया बापट या जोडीने नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला उपस्थिती लावली. यावेळी माझाशी बोलताना दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर म्हणाला, खरंतर आजचा दिवस ऐतिहासिक आहे. दिग्दर्शक म्हणून मी केवळ नाटक बसवलं. पण या सर्व कलाकारांनी हे नाटक पेललं, पुढे नेलं. यात मोठा वाटा वैभवचा आहे. कारण तो या नाटकातला कलाकारच नव्हे, तर तो सर्वांचा पालकही आहे.' असं सांगतानाच त्याने झी मराठी, निर्माते राहुल भंडारे, व्यवस्थापक गोट्या सावंत यांचे आभारही मानले.
आज होणारे या नाटकाचे पाचही प्रयोग हाऊसफुल्ल झाले आहेत. रसिकांनी या नाटकाला आणि होणाऱ्या विक्रमाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल सर्वच कलाकारांनी, तंत्रज्ञांनी मायबाप प्रेक्षकांचे आभार मानले.
निर्मात्यांनी दिली साथ आधी पहिले तीन प्रयोग शिवाजी मंदिरला करून त्यानंतर पुढे दिनानाथ नाट्यगृह आणि बोरिवली अशा दोन ठिकाणी प्रयोग करण्याचं योजण्यात आलं होतं. पण या विक्रमाची नोंद ठेवत, नाट्यपरिषद अध्यक्ष, भद्रकाली संस्थेचे निर्माते प्रसाद कांबळी आणि सुयोग नाट्यसंस्थेचे संदेश भट यांनी आपल्या शिवाजी मंदिरच्या तारखा या नाटकाला दिल्या. यामुळेच सलग पाच प्रयोग होऊ शकल्याची कबुलीही यावेळी व्यवस्थापक गोट्या सावंत, राहुल भंडारे यांनी दिली. यावेळी यांचे आभार तर त्यांनी मानलेच. शिवाय, प्रशांत दामले यांचेही आभार या दोघांनी मानले.