Tanushree Dutta On Nana Patekar: नाना पाटेकर माझ्या जीवावर उठलाय, त्याचे गँगस्टरशी संबंध, मराठी माणूस म्हणून सहानुभूती घेतोय, तनुश्री दत्ताचे पुन्हा खळबळजनक आरोप
Tanushree Dutta On Nana Patekar: नाना पाटेकरांचे गँगस्टरशी संबंध आहेत, मराठी माणूस म्हणून ते सहानुभूती घेतायत, असा आरोपही तनुश्री दत्तानं केलाय.

Tanushree Dutta On Nana Patekar: भारतात #MeToo चळवळीची सुरुवात करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने (Actress Tanushree Dutta) नुकताच इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सांगत आहेत की, गेल्या 4-5 वर्षांपासून तिचा स्वतःच्या घरात छळ होत आहे. या व्हिडीओमध्ये ती रडताना दिसत आहे. यानंतर ABP माझाशी बोलताना तनुश्री दत्तानं अभिनेते नाना पाटेकरांवर गंभीर आरोप केले आहेत. नाना पाटेकर आणि गँग त्रास देत असल्याचा आरोप तनुश्रीनं केलाय. याव्यतिरिक्त तिच्या स्वतःच्याच घरात तिला मानसिक त्रासाला, तसेच शारीरिक छळाला सामोरं जावं लागतंय, असं तिनं म्हटलं आहे.
अभिनेत्रीनं तनुश्री दत्तानं दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. नाना पाटेकर आणि बॉलिवूडची माफिया गँग मिळून मला त्रास देतेय, असं तनुश्री दत्ता म्हणाली. तसेच, नाना पाटेकरांचे गँगस्टरशी संबंध आहेत, मराठी माणूस म्हणून ते सहानुभूती घेतायत, असा आरोपही तनुश्री दत्तानं केलाय.
अभिनेत्री तनुश्री दत्ता नेमकं काय म्हणाली?
ABP माझाशी बोलताना तनुश्री दत्तानं सांगितलं की, "मी शेअर केलेला व्हिडीओ म्हणजे, ते माझं 4 ते 5 वर्षांचं फ्रस्टेशन आहे... तुम्ही फ्रेस्ट्रेशन म्हणा, राग म्हणाल किंवा आणि काहीतरी म्हणा. कारण गेल्या 4 ते 5 वर्षांत माझ्यासोबत एवढ्या घटना घडल्या आहेत. काही लोकांचं, गुंडांचं मला फॉलो करणं... माझा विचित्र पद्धतींनी छळ करणं, 2020 नंतर माझे जेवढे मोठे प्रोजेक्ट्स आहेत, त्यातून मला सिस्टमॅटिकली बाजूला केलं गेलंय. मला काम करण्यापासून रोखलं गेलंय... माझे फोन, ईमेल हॅक केल्यामुळे त्यांना माझ्या सगळ्या गोष्टी समजत होत्या. माझं कुठेही काहीतरी काम होत होतं, ते मध्ये येऊन ते सगळे बिघडवायचे... माझ्याबाबत लोकांच्या मनात उलट्या सुलट्या गोष्टी, भलत्याच गोष्टी पेरल्या, मला सगळ्यांपासून दूर केलं..."
"2022 मध्ये मी उज्जैनला गेलेली... कारण माझ्या घरात एक हाऊस हेल्पर प्लांट केलेली. ती माझ्या जेवणात काहीतरी मिसळायची... मी सारखी आजारी पडायची... तिला मी माझ्या घरातून मी कसतरी बाहेर काढलं आणि मी पळून उज्जैनला गेलेली... तिथे जाऊन माझा अपघात झाला... अपघात का झाला? कारण मी ज्या रिक्षानं प्रवास करत होते, त्याचे ब्रेक कुणीतरी फेल केले होते... त्यावेळी मला समजलं की, मला कुणीतरी फॉलो करतंय... त्यांना सगळं माहिती होतं... मी कुठे जातेय, काय करतेय... अपघातानंतर माझी अवस्था फारच खराब होती... मी दोन ते तीन महिने आजारी होते... त्यानंतर मी हळूहळू ठीक झाले... मग ते पुन्हा त्रास देऊ लागले...", असं तनुश्री दत्ता म्हणाली.
सुशांत सिंह राजपूतसोबत ज्या-ज्या गोष्टी घडल्या, त्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या : तनुश्री दत्ता
तनुश्री दत्ता म्हणाली की, "मी कुणाचं नाव तर घेत नाही, पण या सर्व गोष्टी माझ्यासोबत 2018 नंतर पासूनच सुरू झाल्या. 2018 आधी माझा कधीच अपघात नव्हता झालेला, माझा कुणीतरी पाठलाग करतोय, असा विचारही कधी केला नव्हता. प्रत्येकजण त्याचं कनेक्शन 2018 च्या माझ्या आरोपांशी जोडतोय... नाना पाटेकर हा एकटा नाहीये, बॉलिवूडमधली माफिया गँग आहे, जी या सगळ्या काळ्या करतुदींमध्ये सहभागी आहे... त्यांना माझा प्रॉब्लेम असेलच ना... माफिया गँगमध्ये कोण-कोण आहे, हे मी सांगू शकत नाही... पण मी हे सांगते की, सुशांत सिंह राजपूतसोबत ज्या-ज्या गोष्टी घडल्या, त्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या आणि अजून घडतायत... फक्त फरक एवढाच आहे की, त्याचा मृत्यू झालाय आणि मी जिवंत आहे. आणि मी जिवंत आहे कारण, मी सुशांत सिंह राजपूतची संपूर्ण केस वाचलेली, संपूर्ण केसचा अभ्यास केलेला... अजून एक मुलगी आहे, पूजा मिश्रा... तिचे व्हिडीओ पाहा, तसं तिला सगळ्यांनी वेड ठरवलंय, पण तिच्या व्हिडीओमधल्या अनेक गोष्टींमध्ये तथ्य आहे...."
"मी यांच्यावर ME TOO ची केस फाईल केली होती. हे जे शैतानी वृत्तीचे लोक असतात, यांचा अहंकार खूप मोठा असतो... ज्यावेळी यांना कुणी उघडं पाडत असेल, त्यावेळी त्यांना ते सहन होत नाही... त्यामुळे त्यांना समोरच्याला संपवायचं असतं. मी ज्यावेळी तक्रार दाखल केलेली... पण, इथे एक परप्रांतिय मरुन जाईल, पण एक मराठी माणूस क्रिमिनल असला तरीसुद्धा पोलिसांचा सपोर्ट त्यालाच मिळतो. मंत्रीसुद्धा त्यालाच सपोर्ट करतात. त्यामुळे त्याची हिंमत वाढली, त्याचा अहंकार वाढला... त्याच्या मनात आलं असेल, आता हिला मी चांगलीच अद्दल घडवतो... आता तर मी हिला संपवूनच टाकतो...", असंही तनुश्री दत्ता म्हणाली.
नाना पाटेकरांनी माझ्या स्टारडमचा वापर करुन स्वतःचं बुडालेलं करिअर उभं केलं : तनुश्री दत्ता
तनुश्री दत्ता म्हणाली की, "तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, नाना पाटेकर अजिबात मोठा अभिनेता नाही... ज्यावेळी मी त्याच्यासोबत फिल्म केलेली, त्यावेळी त्याच्याकडे एकही फिल्म नव्हती... निर्माते, दिग्दर्शक माझ्याकडे भिक मागत आलेले की, तुम्ही जर ही फिल्म केली, तर फिल्म विकली जाईल... जर हा तेवढाच मोठा अॅक्टर असता, तर त्यांना मला आयटम साँगसाठी घ्यावं लागलं नसतं... फक्त कागदावर नाना पाटेकरचं लेजंडरी अभिनेता असल्याचं आहे... पण प्रत्यक्षात मात्र, 2008 मध्ये त्याच्याकडे फिल्म नव्हती. 2008 मध्ये मी सर्वात मोठी अभिनेत्री होते. त्यावेळी मला फक्त देशातलेच नाहीतर, जगभरातले लोक ओळखत होते... त्याचे तर 70 च्या दशकात सिनेमे आलेले... त्यानं लीड रोलच्या हिशोबानं फक्त समांतर सिनेमे केलेले... मी लीड अॅक्ट्रेस होती आणि एक स्टार होती... त्यामुळे नाना पाटेकरनं माझ्या स्टारडमचा वापर करुन स्वतःचं करिअल उभं करण्याचा प्रयत्न केला.... नाना पाटेकरसोबत त्यावेळी कुणीच काम करायला तयार नव्हतं... कारण त्याचा स्वभाव फारच घाणेरडा होता..."
कोण आहे तनुश्री दत्ता?
तनुश्री दत्ता ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने 2004 मध्ये 'मिस इंडिया' स्पर्धा जिंकली होती. तनुश्री दत्ताचा जन्म 19 मार्च 1984 रोजी झाला. तिने कॉमर्समध्ये पदवी घेतली आहे. 2005 मध्ये तिने 'Sssshhh...' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2018 मध्ये, तिने #MeToo चळवळीमध्ये लैंगिक शोषणाचे आरोप करून खळबळ उडवून दिली होती. 2018 मध्ये, तनुश्री दत्ताने #MeToo चळवळीमध्ये अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. तिने नाना पाटेकर यांच्यासह अनेक जणांवर आरोप केले आणि या आरोपांमुळे बराच वाद निर्माण झाला.
पाहा व्हिडीओ : Tanushree Dutta on Nana Patekar : नाना पाटेकरांवर पुन्हा खळबळजनक आरोप, तनुश्री दत्ता EXCLUSIVE
महत्त्वाच्या इतर बातम्या :























