दीपिकाच्या प्रेमातला 'सिद्धांत'
लॉकडाऊनमुळे हे चित्रिकरण थांबलं होतं. पण कालांतराने हे चित्रिकरण सुरू झाल्यावर दीपिकाला एनसीबीचं बोलावणं आलं होतं. त्यावेळी दीपिका गोव्यात याच चित्रपटाचं चित्रिकरण करत होती.
मुंबई : गली बॉय या चित्रपटातली प्रत्येक व्यक्तिरेखा लोकांच्या लक्षात राहिली. यातला रणवीर सिंग, आलिया भट, अमृता सिंग, विजय राजपासून ज्योती सुभाषही लक्षात राहतात. यातली अशीच आणखी एक लक्षात राहणारी व्यक्तिरेखा आहे ती एमसी शेर वठवलेल्या सिद्धांत चतुर्वेदीची. सिद्धांतच्या कामाची दखल बॉलिवूड इंडस्ट्रीने घेतली. एकिकडे नेपोटिझमने वेढून गेलेली इंडस्ट्री असं तिचं नामकरण झालं असतानाच सिद्धांतला मात्र आपल्या कामातून काम येत गेलं. सिद्धांत सध्या शकुन बत्रा यांच्या नव्या सिनेमात काम करतोय. त्यात त्याच्यासोबत स्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण काम करते आहे. दीपिकाचं गुणगात गातागात सिद्धांत थकत नाहीय हे खरं.
सिद्धांत आणि दीपिका पहिल्यांदाच एकत्र काम करताहेत. दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता यावर बोलताना सिद्धांत म्हणतो, 'दीपिकाच्या कामाची पद्धत पूर्ण वेगळी आहे. ती जेव्हा कमा करते तेव्हा स्वत:ला पूर्ण झोकून देते. म्हणून ती द दीपिका पदुकोण असली तरी चित्रिकरणावेळी ती नेहमी पूर्णत: ती भूमिका जगत असते. मला तिच्यासोबत काम करताना म्हणून कोणतंही प्रेशर आलं नाही.' दीपिका पदुकोण शकुन बत्राच्या या चित्रिकरणात व्यग्र होती. लॉकडाऊनमुळे हे चित्रिकरण थांबलं होतं. पण कालांतराने हे चित्रिकरण सुरू झाल्यावर दीपिकाला एनसीबीचं बोलावणं आलं होतं. त्यावेळी दीपिका गोव्यात याच चित्रपटाचं चित्रिकरण करत होती. या चित्रपटात तिच्यासोबत सिद्धांतही आहे.
दीपिकाची चौकशी झाल्यानंतर आठवडाभराने दीपिका पुन्हा एकदा चित्रिकरणासाठी दाखल झाली. त्यावेळी तिला सोपं जावं म्हणून एक हलका-फुलका सीन इथे नियोजित होता. सातत्याने चर्चेत राहूनही.. एनसीबीने बोलावल्यानंतर तयार झालेले वाद पाहता दीपिका अत्यंत शांतपणे या चित्रिकरणात सहभागी झाली होती. सिद्धांतने त्यावेळीही तिचं खूप कौतुक केलं होतं. आता हे चित्रिकरण पूर्ण झालं आहे. शकुन बत्राचं चित्रिकरण पूर्ण झाल्यावर सिद्धांत दुसऱ्या चित्रपटांच्या चित्रिकरणात व्यग्र झाला आहे. तर दीपिका आता पठाण चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी दाखल झाली आहे. या चित्रपटात तिचा नायक शाहरुख खान असणार आहे.