मोठी बातमी : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा धक्का, तातडीने अँजिओप्लास्टी
अवघ्या 47 व्या वर्षी श्रेयस तळपदेला हृदयविकारचा झटका आला. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदेवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याचं रुग्णालयाकडून माहिती देण्यात आलीये.
मुंबई : मराठी अभिनेता श्रेयस तळपदे (shreyas talpade) याला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याची माहिती समोर आलीये. श्रेयसला मुंबईतील अंधेरीच्या बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदेवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याचं रुग्णालयाकडून माहिती देण्यात आलीये. अवघ्या 47 व्या वर्षी श्रेयस तळपदेला हृदयविकारचा झटका आला. श्रेयस तळपदे आज 'वेलकम टू द जंगल' (Welcome to Jungle) या चित्रपटाचे शूटिंग करत होता आणि शूटिंग संपल्यानंतर तो घरी पोहोचला तेव्हा त्याला छातीत दुखू लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
सध्या अँजिओप्लास्टीनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र रुग्णालयाने सध्या कोणतेही वैद्यकीय बुलेटिन जारी केलेले नाही. श्रेयस तळपदे या मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीला नावाजलेला अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. दरम्यान श्रेयसच्या प्रकृतीबाबतच्या या बातमीने सर्वांनाच धक्का बसला असल्याचं सांगण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं?
श्रेयस गुरुवार 14 डिसेंबर रोजी वेलकम टू जंगल या सिनेमाच्या शुटींगला गेला होता. त्याच्या वेळेनुसार तो सेटवर देखील पोहचला. माहितीनुसार, तो सेटवर सगळ्यांशी व्यवस्थित आणि हसून खेळून बोलत होता. त्याने दिवसभर शुटींग देखील केले आणि तो पूर्णपणे ठिक होता. त्याने काही अॅक्शन शोट्स देखील शूट केले. त्यानंतर तो घरी परतला आणि त्याने त्याची पत्नी दिप्ती हिला सांगितले की, थोडं अस्वस्थ वाटतंय. तिने ताडडीने त्याला रुग्णायलात नेले पण वाटेतच श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला.
श्रेयसने आतापर्यंत मराठी रंगभूमी, छोटा पडद्यावर तसेच मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्याने त्याच्या आतपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये 45 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. सध्या तो वेलकम टू जंगल या चित्रपटामध्ये काम करतोय. या चित्रपटामध्ये त्याच्या सोबत अक्षय कुमार, रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडिस, लारा दत्ता, सुनील शेट्टी, संजय दत्त, परेश रावल, अर्शद वारसी, तुषार कपूर, राजपाल यादव, जॉनी लिव्हर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार आहेत. श्रेयसची प्रकृती आता स्थिर असली तरीही अद्याप त्याच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी कोणतीही दिलेली नाही.