(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'मुंबाई मातेचा अवमान करणारे बेइमान', सामनातून टीका, कंगनानंही दिलं उत्तर
आजच्या सामनाच्या 'बेइमान लेकाचे- मुंबाई मातेचा अवमान' या अग्रलेखात शिवसेनेनं कंगना आणि तिला पाठिंबा देणाऱ्यांवर टीका केली आहे. याला कंगनाने देखील ट्वीट करत उत्तर दिलं आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई पोलीस आणि मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वक्तव्यानंतर तिच्या विरोधात टिकेची झोड उठली आहे. यात शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना असा कलगीतुरा चांगलाच रंगला, जो अजुनही थांबलेला नाही. आजच्या सामनाच्या 'बेइमान लेकाचे- मुंबाई मातेचा अवमान' या अग्रलेखात शिवसेनेनं कंगना आणि तिला पाठिंबा देणाऱ्यांवर टीका केली आहे. ‘मुंबाई’ मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. बेइमान लेकाचे! या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये इतकीच अपेक्षा असल्याचं या अग्रलेखात म्हटलं आहे. तर याला कंगनाने देखील उत्तर दिलं आहे. 'मी 16 वर्षांची असताना मुंबईला आले होते. त्यावेळी काही मित्रांसोबत मुम्बादेवीच्या दर्शनाला गेले आणि मला मुम्बादेवीनं तिच्याजवळ ठेवून घेतलं', असं कंगनानं ट्वीट करत म्हटलं आहे.
काय म्हटलंय कंगनाच्या ट्विटमध्ये कंगनाच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'मी 12 वर्षांची असताना हिमाचल सोडून चंदीगडला हॉस्टेलला गेले. तिथून दिल्लीत राहिले आणि 16 वर्षांची असताना मुंबईत आले. काही मित्र म्हणाले मुंबईत तेच राहतात, ज्यांना मुम्बादेवी प्रसन्न होते. आम्ही सगळे मुम्बादेवीच्या दर्शनाला गेलो. सगळे मित्र परत गेले मात्र मला मुम्बादेवीनं तिच्याजवळ ठेवून घेतलं'. आज सकाळी देखील कंगनाने एक ट्वीट केलं होतं. त्यामध्ये ती म्हणाली आहे की, 'राणी लक्ष्मीबाईंचा पराक्रम, शौर्य आणि बलिदान मी चित्रपटामार्फत जगले आहे. दुःखद गोष्ट म्हणजे, मला माझ्याच महाराष्ट्रात येण्यापासून रोखण्यात येत आहे. मी राणी लक्ष्मीबाईंच्या आदर्शांवर चालणार आहे. नाही घाबरणार, नाही झुकणार. अन्यायाविरोधात आवाज उठवत राहणार. जय महाराष्ट्र, जय शिवाजी'
मैं बारह साल की उम्र में हिमांचल छोड़ चंडीगढ़ हॉस्टल गयी फिर दिल्ली में रही और सोलह साल की थी जब मुंबई आयी, कुछ दोस्तों ने कहा मुंबई में वही रहता है जिसे मुम्बादेवी चाहती है,हम सब मुम्बादेवी देवी के दर्शन करने गए,सब दोस्त वापिस चले गए और मुम्बादेवी ने मुझे अपने पास ही रख लिया ????
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा ‘हरामखोरीच’ म्हणजे मातीशी बेइमानीच आहे. महाराष्ट्रातील बेइमानांच्या पाठीशी जे उभे राहात आहेत, त्यांना 106 हुतात्म्यांचे तळतळाट लागतीलच, पण राज्याची 11 कोटी जनताही माफ करणार नाही, असं म्हणत शिवसेनेनं टीका केली आहे.
ड्रग्स प्रकरणात रियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्ज फेटाळला
‘मुंबाई’ मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. बेइमान लेकाचे! या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये इतकीच अपेक्षा असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. मुंबई महाराष्ट्राचीच आहे. ती मुंबईत इमानाने राहणाऱ्या सर्वांची आहे. कारण ती हिंदुस्थानची आहे, पण ती आधी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची आहे. म्हणूनच ती हिंदुस्थानची आहे. त्यामुळे मुंबईची तुलना ‘पाकव्याप्त’ कश्मीरशी करणे व मुंबई पोलिसांना माफिया वगैरे हिणवून खाकी वर्दीचा अवमान करणे हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे.
आपले 106 हुतात्मेही स्वर्गात अश्रू ढाळत असतील
महाराष्ट्रातील 11 कोटी मऱ्हाटी जनतेस तर हा असा मुंबईचा अवमान म्हणजे देशद्रोहासारखा गुन्हा वाटतो, पण असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीच्या मागे राष्ट्रभक्त मोदी सरकारचे गृहमंत्रालय सुरक्षा कवच घेऊन ठामपणे उभे राहते तेव्हा आपले 106 हुतात्मेही स्वर्गात अश्रू ढाळत असतील. महाराष्ट्र हा सत्यवादी हरिश्चंद्राचा पूजक आहे. मऱहाटी जनांशी बेइमानी करणाऱ्या विकृतांशी मराठी माणूस सतत लढत राहिला. कोणीही यावे आणि महाराष्ट्राच्या मऱ्हाटी राजधानीवर टपली मारावी, कोणीही ऐऱ्यागैऱ्याने उठावे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून आव्हानाची भाषा करावी या विरोधात संपूर्ण महाराष्ट्राने एकवटायला हवे. ‘देवी’स्वरूप आईची तुलना पाकव्याप्त भागाशी करून आमच्या देवीचाच अवमान केला. हिंदुत्वाचा आणि संस्कृतीचा, धर्माचा आणि 106 हुतात्म्यांच्या त्यागाचाच अवमान केला व असा अवमान करून छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रावर नशेच्या पिचकाऱ्या टाकणाऱ्या व्यक्तीला केंद्र सरकार विशेष सुरक्षेच्या पालखीचा मान देत आहे.
मुंबादेवीचा हा अवमान ज्यांना प्रिय आहे असे लोक दिल्लीत आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात बसले आहेत म्हणून मुंबईचा धोका कायम आहे. मुंबईला आधी बदनाम करायचे, नंतर खिळखिळे करायचे. मुंबईस संपूर्ण कंगाल करून एक दिवस ती महाराष्ट्रापासून तोडायची या कारस्थानाची पावले नव्याने पडू लागली आहेत हे आता स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्रातील लोकनियुक्त सरकारच्या अधिकारावर आणि स्वातंत्र्यावर हल्ले करण्याची एकही संधी महाराष्ट्रातील भाजपवाले आणि केंद्र सरकार सोडत नाही, असं सामनात म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
अभिनेत्री कंगना रनौतविरोधात विधानपरिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस
कंगना रनौतच्या ऑफिसला बीएमसीकडून नोटीस; रहिवाशी जागेचा कार्यालयीन वापर केल्याचा ठपका