सरकारकडून सचिन पिळगावकरांना एकदम एवढी स्मृतीचिन्हे? मंत्री आशिष शेलारांनी उलगडली 'सत्यकथा'
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि त्यांचे वडील, प्रख्यात चित्रपट निर्माते स्व. शरद पिळगावकर यांना महाराष्ट्र शासनातर्फे मिळालेल्या पुरस्काराची स्मृतीचिन्हं गहाळ झाली होती.

मुंबई : मराठी सिनेसृष्टीला (Cinema) आपल्या अभिनय आणि दिग्दर्शनातून वेगळी ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin pilgaonkar) यांचा सिनेसृष्टीतील अनुभव दांडगा आहे. विशेष म्हणजे बालकलाकार म्हणूनच त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. त्यातही राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळला होता. त्यामुळे, लहानपणापासूनच त्यांनी कर्तृत्वाच्या जोरावर सन्मान आणि गौरव मिळवला आहे. सिनेसृष्टीता त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. त्यामध्ये, महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. मात्र, शासनाने त्यांना दिलेली सन्मान-स्मृतीचिन्हे गहाळ झाल्याची तक्रार त्यांनी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार (Ashish shelar) यांच्याकडे केली होती. अखेर, सरकार दफ्तरी त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन त्यांना ही स्मृती चिन्हे नव्याने देण्यात आली आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि त्यांचे वडील, प्रख्यात चित्रपट निर्माते स्व. शरद पिळगावकर यांना महाराष्ट्र शासनातर्फे मिळालेल्या पुरस्काराची स्मृतीचिन्हं गहाळ झाली होती. या गोष्टीचे दुःख स्वतः सचिन पिळगाकर यांनी सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांच्याकडे व्यक्त केले होते. त्यावर, दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर आता पिळगावकर यांना पुन्हा नव्याने ही सन्मानचिन्ह उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. स्वत: आशिष शेलार यांनी याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली. कलावंताला झालेलं दुःख माझ्या लक्षात आलं आणि ती स्मृतीचिन्हं त्यांच्या संग्रहात पुन्हा असावीत म्हणून आमच्या फिल्मसिटी विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भातील नोंदी शोधून काढण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज ही स्मृतीचिन्हं सन्मानपुर्वक उपलब्ध करुन देत तितक्याच सन्मानाने व आदराने सुपूर्त केली. यावेळी फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर उपस्थित होते, असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि त्यांचे वडील, प्रख्यात चित्रपट निर्माते स्व. शरद पिळगावकर जी यांना महाराष्ट्र शासनातर्फे मिळालेल्या पुरस्काराची स्मृतीचिन्हं गहाळ झाली होती. या गोष्टीचे दुःख स्वतः सचिनजींनी माझ्याकडे व्यक्त केले होते. कलावंताला झालेलं दुःख… pic.twitter.com/SoH972Pfp5
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 22, 2025
बालपणीच राष्ट्रीय पुरस्कार
सचिन पिळगावकर यांनी 'हा माझा मार्ग एकला' या चित्रपटातून त्यांच्या अभिनयाला सुरुवात केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटातील भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. त्यानंतर ते राजश्री प्रॉडक्शन हाऊसशी जोडले गेले. यादरम्यान त्यांना 'गीत गाता चल' हा सिनेमा मिळाला, ज्यामध्ये ते सारिकासोबत झळकले होते. त्यांचा हा चित्रपट यशस्वी ठरला आणि त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. नदीयों के पार हा त्यांचा चित्रपट तुफान गाजला होता. तर, शोले या ब्लॉकबस्टर सिनेमातील त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली. मराठी सिनेसृष्टीत त्यांच्या 'अशीही बनवा बनवी', 'गंमत जंमत', 'आत्या घरात घरोबा', 'नवरा माझा नवसाचा', 'एकापेक्षा एक' यांसारख्या सिनेमांनी तिकीट खिडकीवर धुमाकूळ घातला होता. त्यातील, अशी ही बनवा बनवी हा सिनेमा माईलस्टोन ठरला आहे.
























