Prasad Oak : 'धर्मवीर2' चा हाऊसफुल्ल प्रवास ते पुन्हा एकदा दिग्दर्शकाची खुर्ची, कसं होतं प्रसादसाठी 2024 वर्ष?
Prasad Oak : प्रसाद ओकसाठी 2024 हे वर्ष कसं होतं त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Prasad Oak : सरत्या वर्षाला निरोप देताना कलाकार अजून देखील दमदार काम करताना दिसतायत. यामधीलत एक कलाकार म्हणजे अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता प्रसाद ओक. प्रसाद ओकने 'धर्मवीर 2' (Dharmaveer 2) सिनेमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने 2024 हे वर्ष गाजवलं. धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका त्याने साकारली आणि या भूमिकेला प्रेक्षकांनी पुन्हा एकदा भरभरून प्रेम दिलं. जगभरातून या भूमिकेला उदंड प्रतिसाद मिळाला आणि प्रसाद ने साकारलेली भूमिका दमदार ठरली. प्रसाद (Prasad Oak) कायमच वेगवेगळ्या विषय असलेल्या चित्रपटात भूमिका करताना दिसतो आणि अशीच एक भूमिका असलेला हा चित्रपट होता.
येणाऱ्या वर्षात प्रसाद अभिनेता म्हणून वेगवेगळ्या चित्रपटात दिसणार आहेच, पण तो एका धमाल चित्रपटाचं दिग्दर्शन करताना ही दिसणार आहे. "सुशीला - सुजीत" ची कथा देखील प्रसाद ओकनेच लिहिली आहे. दिग्दर्शक आणि कथा लेखन अशी दुहेरी भूमिका सुशीला - सुजीत मध्ये प्रसाद साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट 18 एप्रिल 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रसादने सरत्या वर्षाविषयी काय म्हटलं?
प्रसादने सरत्या वर्षाविषयी बोलताना म्हटलं की, वेगळ्या विषयांवरचे आणि चांगले चित्रपट आले की प्रेक्षक त्याला उत्तम प्रतिसाद देतातच. गेल्या दोन ते तीन वर्षात धर्मवीर, चंद्रमुखी, बाईपण भारी देवा, झिम्मा, धर्मवीर २, सरसेनापती हंबीरराव, वाळवी, वेड, नाच गं घुमा, नवरा माझा नवसाचा २, फुलवंती, ये रे ये रे पैसा, पावनखिंड अशा अनेक चित्रपटांनी हे सिद्ध केलं. सरतं वर्ष उत्तम गेलं. येणार वर्षही उत्तमच जमणार मराठी प्रेक्षक चांगले सिनेमे नक्की उचलून धरणार.
नवीन वर्षाची सुरुवात प्रसाद " जिलबी " या सस्पेन्स थ्रिलर ने करणार असून यात तो एका उद्योगपतीची भूमिका करताना दिसणार आहे. येत्या 17 जानेवारी 2025 ला जिलबी प्रदर्शित होणार असून प्रसाद एका वेगळ्याच भूमिकेत यात दिसणार आहे.जिलबी, गुलकंद, वडा पाव, मीरा, आणि महापरिनिर्वाण या चित्रपटांमधून अभिनय, तर सुशीला सुजीत, पठ्ठे बापूराव, भद्रकाली, आणि निळू फुले यांच्यावरचा चरित्रपट अशा विविध चित्रपटांचं दिग्दर्शन सुद्धा प्रसाद येणाऱ्या वर्षात करणार आहे.