Om Puri Birth Anniversary : दमदार आवाज, जबरदस्त अभिनय, ओम पुरींचा वेगळाच अंदाज, जाणून घ्या त्यांच्याविषयी खास गोष्टी
Om Puri Birth Anniversary : ओम पुरी यांनी मुख्य प्रवाहातील चित्रपटांसोबत समांतर चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.आक्रोश या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या आदिवासी तरुणाची भूमिका आणि तमस चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली.
Om Puri Birth Anniversary : भारतीय चित्रपटसृष्टीतील एक चतुरस्त्र, प्रतिभावान आणि आपल्या अभिनय आणि जादूई आवाजाने चित्रपटसृष्टीवर एक वेगळाच ठसा उमटवणारा अभिनेता ओम पुरी यांची आज जयंती. आपल्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी कॉमेडी, ड्रामा, व्यावसायिक, आर्ट सिनेमा अशा विविध प्रकारच्या चित्रपटांत विविधांगी भूमिका पार पाडल्या.
त्यांचे पूर्ण नाव ओम प्रकाश बक्षी. त्यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1950 रोजी पंजाबमधील अंबाला या ठिकाणी झाला. त्यांना त्यांची जन्म तारीख नेमकी माहित नव्हती. त्यांच्या आईने सांगितले की दसऱ्यानंतर दोन दिवसात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रेल्वे विभागात नोकरीला होते.
ओम पुरींचे बालपण अतिशय हालाखीत गेले. ते सहा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांना सिमेंट चोरीच्या आरोपाखाली अटक झाली. त्यानंतर कुटुंबाची आर्थिक गरज भागवण्यासाठी ते चहाच्या टपरीवर काम करायचे. तसेच आजूबाजूच्या रेल्वे ट्रॅकवरून कोळसा जमा करण्याचं काम करायचे.
जगण्यासाठी पडेल ते काम करता करता त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी थिएटर आर्टच्या शिक्षणासाठी दिल्लीच्या नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा NSD या ठिकाणी प्रवेश घेतला. त्या ठिकाणी त्यांना सिनिअर असणारे नसरुद्दीन शहा भेटले. नसरुद्दीन शहांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अभिनयाचे धडे गिरवायला सुरवात केली. नसरुद्दीन शहा हे शेवटपर्यंत त्यांचे चांगले मित्र राहिले.
पुढे नसरुद्दीन शहा यांनी पुण्याच्या फिल्म अॅंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII या संस्थेत प्रवेश घेतला आणि ओम पुरींनाही या ठिकाणी प्रवेश घ्यायला लावला. त्यावेळी त्यांच्याकडे घालायला चांगला शर्टही नव्हता असं ओम पुरी गंमतीने म्हणायचे.
सुरवातीला ओम पुरींनी 'चोर चोर छूप जा' या लहान मुलांवर आधारित चित्रपटात छोटेखानी भूमिका केली. पण 1976 साली त्यांनी विजय तेंडुलकर यांच्या मराठीतील 'घाशीराम कोतवाल' या नाटकावर आधारित के हरिहरन आणि मनी कौल यांनी त्यांच्या FTII च्या इतर 16 सहकाऱ्यांसोबत तयार केलेल्या चित्रपटात काम करुन त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरवात केली.
त्यांचा ह्दयाला भिडणारा आवाज आणि अभिनयातील बारकावे, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव यामुळे ते अल्पावधीतच घराघरात पोहोचले.
मुख्य प्रवाहातील व्यावसायिक हिंदी चित्रपट तसेच समांतर चित्रपटात काम करायला सुरवात केली. त्यांचे आक्रोश , आरोहण, अर्धसत्य, मिर्च मसाला, तमस, सदगती, सिटी ऑफ जॉय असे गंभीर चित्रपट विशेष गाजले. त्याचसोबत जाने भी दो यारों आणि चाची 420 सारख्या चित्रपटीस त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले. आक्रोश या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या आदिवासी तरुणाची भूमिका आणि तमस चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजल्या. तसेच दुरदर्शनवरील भारत एक खोज या मालिकेतील त्यांच्या भूमिकेने वेगळीच छाप सोडली. त्यांच्या कसदार अभिनयाने त्यांना अमरिश पुरी, नसरुद्दीन शहा, स्मिता पाटील यांच्या पंक्तीत जाऊन बसवले.
मला माझ्या चेहऱ्याचा अभिमान लहानपणी गरीबीमुळे ते रेल्वेचा कोळसा गोळा करायचे काम करायचे. त्याचाच परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर झाला. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरच्या निशाणी पुढे आयुष्यभर कायम राहिल्या. त्यांच्या चेहऱ्याचा ओम पुरींना कधीही न्यूनगंड वाटला नाही. ते म्हणायचे की, "निसर्गाने दिलेल्या चेहऱ्याचा मी स्वीकार करतो. मोठ्या नाकाचा आणि चेहऱ्यावरील खड्ड्यांचा मला अभिमान आहे."
त्यांनी साकारलेल्या आरोहण आणि अर्धसत्य या चित्रपटांतील भूमिकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. 1980 साली प्रदर्शित झालेल्या शोध या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचेही विशेष कौतुक झाले. या चित्रपटाला त्या वर्षीचा सर्वोत्तम राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि गोविंद निहलानी यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपट केले. या दिग्दर्शकांसोबत त्यांची वेगळीच केमेस्ट्री जुळली. त्यांनी 300 पेक्षा जास्त हिंदी चित्रपटांबरोबरच 20 पेक्षा जास्त अमेरिकन आणि इंग्रजी चित्रपटांत भूमिका केल्या.
त्यांचे अभिनय क्षेत्रातले कार्य लक्षात घेता 1990 साली त्यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीने गौरवण्यात आले. तसेच 2004 साली ब्रिटनच्या सरकारकडून ऑर्डर ऑफ एम्पायरचे ऑनररी ऑफिसर पदही त्यांना बहाल करण्यात आले आहे. भारतीय चित्रपटातील एक अष्टपैलू अभिनेता अशी ओळख असलेल्या ओम पुरींचे निधन 2017 साली झाले.
त्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या पत्नी नंदिता पुरी आणि मुलगा इशान पुरी यांनी 2017 साली त्यांच्या नावाने 'ओम पुरी फाउंडेशन' स्थापन केले. यावतीने 'पुरी बातें' हे युट्युब चॅनेल सुरू करण्यात आले आहे. यात ओम पुरींच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल सर्वकाही सांगितले जाणार आहे. दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी ओम पुरींचा एक चांगला मित्र आणि चतुरस्त्र अभिनेता असा गौरव करत त्यांच्या सोबत काम केलेल्या आरोहण, तमस या चित्रपटांचे आणि 'भारत एक खोज' या दुरदर्शनवरील मालिकेच्या स्मृतींना उजाळा दिला.