Nitin Desai: नितीन देसाईंचं दिग्गज नेत्यांच्या अविस्मरणीय क्षणांत योगदान! अवघ्या काही तासांत ठाकरे, मोदींसाठी बनवले खास मंच
Nitin Desai Death: चित्रपट क्षेत्रातील कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवल्यानंतर त्यांनी बनवलेल्या अप्रतिम सेट्सची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.
Nitin Desai Work: प्रसिद्ध कला दिग्दर्शक आणि निर्माते नितीन देसाई (Nitin Desai) यांनी वयाच्या 58 व्या वर्षी आपली जीवन यात्रा संपवली. नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जतमधील एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. अनेक कलाकारांनी तसेच राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नितीन देसाई (Nitin Desai Death) यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नितीन देसाईंचं काम हे केवळ चित्रपटसृष्टीपुरतं मर्यादित न राहता राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली आणि अनेकांना थक्क केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरेंनी देखील त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.
नितीन देसाई यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांसाठी, जाहिरातींसाठी, त्याचसोबत राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमासाठी भव्य-दिव्य सेटची, मंचांची निर्मिती केली आहे. युनिक आणि परिपूर्ण सेट तयार करणं ही नितीन देसाई यांच्या कामाची खासियत मानली जाते. नितीन देसाईंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत नेत्यांच्या खास क्षणांसाठी त्यांच्यासाठी भव्य सेट अवघ्या काही तासांमध्ये उभे करुन दिले आहेत. त्यातच आता चर्चा होतेय, ती म्हणजे नितीन देसाईंनी काही वर्षांपुर्वी अवघ्या 20 तासांत उद्धव ठाकरेंसाठी उभारलेल्या एका सेटची.
उद्धव ठाकरेंसाठी अवघ्या 20 तासांत उभारला सेट
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री बनले त्यावेळी दादरच्या शिवाजी पार्कवर त्यांचा शपथविधी झाला, या कार्यक्रमासाठी शिवाजी पार्कात भव्य असं व्यासपीठ उभारण्यात आलं होतं, यामागे नितीन देसाई यांची मेहनत होती. ज्या व्यासपीठावर उद्धव ठाकरेंचा शपथविधी सोहळा पार पडला तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला होता आणि तो या शपथविधी सोहळ्याचा मुख्य आकर्षण ठरला.
उद्धव ठाकरेंच्या शपथविधीवेळी त्या आकर्षित व्यासपीठाने सर्वांचीच मनं जिंकली आणि व्यासपीठाची एकच चर्चा होऊ लागली. या सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे व्यासपीठ अवघ्या 20 तासांत उभारण्यात आलं होतं आणि हे स्टेज प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी उभं केलं होतं.
व्यासपिठाविषयी बोलताना नितीन देसाई म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमासाठी त्यांच्यासोबत माझ्या ऑफिसमध्ये बसून मी सेट डिझाईन केला होता. व्यासपीठाचं मॉडेल तयार झाल्यानंतर आमच्याकडे संपूर्ण तयारीसाठी केवळ 20 तासांचा वेळ होता. उद्धव ठाकरेंसाठी हा खूप मोठा क्षण होता, त्यामुळे आमच्यात काम करण्याबद्दल खुप उत्साह होता. उद्धव ठाकरेंना शिवरायांप्रति निष्ठा असल्याने त्यांचा पुतळा व्यासपीठावर ठेवण्यात आल्याचंही ते म्हणाले.
View this post on Instagram
नितीन देसाईंच्या कामावर मोदी देखील प्रभावित
कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी 2003 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठीही (PM Modi) भव्य सेट उभारला होता. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की, '2003 मध्ये एका इव्हेंटमध्ये मी मोदीजींसाठी मोठ्या कमळाचा सेट उभारला होता. त्या कमळातून मोदीजींची इव्हेंटमध्ये एन्ट्री झाली होती. एन्ट्री करण्याआधी मोदीजींनी मला बोलवलं होतं. ते मला म्हणाले, तुम्ही वेगळा स्टेज बनवला आहे. या स्टेजवर मी कशी एन्ट्री करायची? मी त्यांना म्हणालो, तुम्हाला काहीही करायचं नाहीये, मी तुमच्यासाठी सर्वकाही केलं आहे. तुम्हाला फक्त तुमच्या स्टाईलमध्ये भाषण द्यायचं आहे.'
'स्टेजवर मोदीजी आले, ते कमळ ओपन झालं आणि त्यांना अडीच लाखांचा मॉब दिसला. त्यानंतर त्यांनी भाषण सुरू केलं. त्यावेळी मोदीजी बोलताना म्हणाले, यावेळी जे लोक आले आहेत, त्यामधील एक लाख लोक हे नरेंद्र मोदी यांना बघायला आले आहेत, तर दीड लाख लोक हे माझे मित्र नितीन देसाई यांनी उभारलेल्या स्टेजला बघायला आले आहेत. त्या इव्हेंटनंतर मोदीजी आणि माझी भेट झाली नाही', असंही नितीन देसाई म्हणाले.
पुढे नितीन देसाई म्हणाले,'त्यानंतर एकेदिवशी मला नरेंद्र मोदीजींचा फोन आला. ते म्हणाले, नरेंद्र मोदी यांचा नितीन देसाई यांना प्रणाम. तुम्ही विचार करत आहात का की, नरेंद्र मोदी मला का फोन करतील? यावर मी नरेंद्र मोदी यांना म्हणालो, सर मला विश्वास बसत नाहीये की, तुम्ही मला फोन केला आहे. मोदी पुढे म्हणाले, तुम्ही माझ्यासाठी जे काम केलं, त्याबद्दल मी दोन दिवस विचार केला. मला तुम्हाला भेटायचं आहे.' असं म्हणत मोदींनी नितीन देसाईंचं कौतुक केलं होतं.
नितीन देसाई यांनी पुढे सांगितलं, 'मोदींनी मला भेटण्यासाठी चार वेळा दिल्या. मी त्यांना 5.30 वाजता भेटलो. आम्ही 45 मिनिटं चर्चा केली. त्यांना मी तेव्हा चार मिनिटांचं माझ्या स्टुडिओचं प्रेझेंटेशन दाखवलं होतं. त्यावेळी ते मला म्हणाले, मी तुला दिडशे नाही तर पाचशे एकर जमीन देतो, तू गुजरातमध्ये येऊन स्टुडिओ बनव. पण मी त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं की, पूर्ण फिल्म इंडस्ट्री इथे आहे आणि गुजरातमध्ये गरमी आहे, तसेच गुजरातमध्ये दारु चालत नाही आणि गोरे लोक जर शूटिंगला आले तर त्यांना दारु प्यायला लागते. माझं बोलणं ऐकल्यानंतर मोदीजी हसले होते आणि म्हणाले, तुला महाराष्ट्रातच स्टुडिओ बनवायचा आहे.'