Raj Kundra Bail :पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा यांना जामीन मंजूर
Pornography Case: पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Pornography Case: पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेला व्यावसायिक राज कुंद्राला (Raj Kundra) अखेर मुंबई मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. सोमवारी राज कुंद्रासह त्याचा सहकारी आणि आयटी प्रमुख रायन थॉर्प यांना कोर्टानं 50 हजारांचा जामीन मंजूर केला. मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेला जामीन या दोघांनी गुरूवारी अर्ज मागे घेतला होता. मुंबई पोलिसांकडून नुकतच न्यायालयात याप्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्याचाच आधार घेत कुंद्रा आता मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात नव्यानं जामीनासाठी याचिका दाखल केली होती. आरोपींविरोधातील तपास पूर्ण झाला आहे, त्यांच्याकडनं आता हस्तगत करण्यासारख काहीच नाही, तसेच आता त्याच्या कोठडीची गरज नाही. असा दावा त्यांच्यावतीनं त्यांचे वकील निरंजन मुंदरगी यांनी कोर्टात केला. तसेच आरोपींवर जी कलमं लावण्यात आलीत त्यात सात वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद नाही. या गोष्टी ग्राह्य धरत मुंबईतील किला कोर्टानं या दोघांना जामीन मंजूर केला.
पॉर्नोग्राफी प्रकरणातील अटकेनंतर जुलै महिन्यापासून तुरूंगात असलेल्या राज कुंद्रासह चार आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी सुमारे दिड हजार पानांचं पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. यात राज कुंद्राचा नातलग प्रदीप बक्षी आणि एक अन्य आरोपी यश ठाकूर यांचा समावेश आहे. या सर्वांवर पिडीत मुलींचा लैंगिक छळ करणे, त्यांची फसवणूक करणे, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमांनुसार पोलिसांनी गंभीर आरोप लावले आहेत.
या पुरवणी आरोपपत्रात कुंद्राच्या मोबाईलमधील इतर आरोपींसोबतचे संदेश लैपटॉपमध्ये सापडलेल्या 60 हुन अधिक अश्लील व्हिडीओ क्लिप पोलिसांनी सोबत जोडलेल्या आहेत. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायद्यातील अनेक आरोप पोलिसांनी पुरवणी आरोपपत्रात ठेवले आहेत. तसेच राज कुंद्रा फेब्रुवारी ते डिसेंबर 2019 पर्यंत आर्म्स प्राइममध्ये संचालक होते. तेव्हा, हॉटशॉटमधून उत्पन्न झालेला महसूल आणि पैसे केनरिन कंपनीच्या लॉयन्स बँक ऑफ जमा केले होते. प्रदीप बक्षी हे लंडनमधील केनरिन कंपनीचे संचालक होते. आरोपी, साक्षीदारांचे जबाब आणि ईमेल आणि संगणकावरून मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2019 ते ऑक्टोबर 2019 पर्यंत गूगलकडून 20 लाख 24 हजार 776 रुपये मिळाले, दुसरीकडे, अँपलकडून ऑगस्ट 2019 ते डिसेंबर 2020 पर्यंत 1 कोटी 16 लाख 58 हजार 925 रुपये मिळाले असल्याचं आरोपत्रात नमूद करण्यात आलेलं आहे.
दरम्यान राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीनं याप्रकरणी मीडियाविरोधात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी 1 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली. या प्रकरणावर तातडीच्या सुनावणीची गरज काय?, असा सवालही कोर्टानं उपस्थित केला.