Fawad Khan : फवाद खानचा सिनेमा, विरोधाचा 'पडदा;' 'द लिजेंड ऑफ मौला जट्ट'ला मनसेच्या विरोधाची 'सीरीज'
Fawad Khan : पाकिस्तानी कलाकार फवाद खानचा 'द लिजेंड ऑफ मौला जट्ट' हा सिनेमा भारतात प्रदर्शित होणार आहे. पण या सिनेमासाठी विरोध सुरु झाला असल्याचं पाहायला मिळतंय.
MNS on Fawad Khan Movie : पाकिस्तानी कलाकार फवाद खान (Fawad Khan) आणि त्याचा पाकिस्तानी सिनेमा 'द लिजेंड ऑफ मौला जट्ट' भारतात प्रदर्शित होणार असल्याची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा होताच राज ठाकरेंनी (Raj Thackeray) त्याला विरोध करत तलवार उपसली आहे. मनसे हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका मनसेकडून घेण्यात आलीये.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्स पोस्ट करत काही सवाल उपस्थित केले आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात? हा सिनेमा जेंव्हा प्रदर्शित होणार आहे, त्याच्या आसपास
नवरात्रौत्सव सुरु होणार आहे. अशा वेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही. तशीच ती इच्छा
राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री डीजीपींची देखील नसणार आणि उगाच संघर्ष आम्हाला पण नको आहे
राज ठाकरेंचा सिनेमाला विरोध
राज ठाकरेंनी पाकिस्तानी सिनेमाला विरोध करत आणि गर्भित इशारा देत तलवार उपसली. लगोलगच मनसेचे नेते अमेय खोपकर यांनीही सिनेमा प्रदर्शित करणाऱ्याच्या कानाखाली आवाज काढण्याची थेट धमकीच दिली. अमेय खोपकर म्हणाले की, पाकिस्तानी कलाकार, पाकिस्तानी सिनेमा याला आमचा शंभर टक्के विरोध आहे. 2 तारखेला यांनी जो घाट घातला आहे, तो होऊ देणार नाही.
पाक चित्रपटांना मनसेच्या विरोधाची 'सीरीज'
फवाद खानच्या ये दिल है मुश्किल सिनेमाला मनसेनं विरोध केला होता..अदनान सामीलाही मनसेनं विरोध केला होता. त्याचप्रमाणे पाक गायक आतिफ असलमच्या बॉलिवूडमधील पुनरागमनाला मनसेकडूनही विरोध करण्यात आला होता.शाहरूखच्या 'रईस'मधील पाकिस्तानी कलाकार माहिरा खानलाही मनसेचा विरोध होता. राहत फतेह अली खानच्या कार्यक्रमांनाही मनसेचा विरोध होता. भारत-पाक क्रिकेट सामन्यांनाही मनसेचा विरोध होता. आताही हाच विरोधाचा सूर पाकिस्तानी चित्रपट द लिजेंड ऑफ मौला जट्टबाबत मनसेनं आळवलाय.
भारताच्या सीमांवर पाकिस्तानकडून अनेकदा आगाऊपणा केला जातो, तोच धागा पकडत मनसे नेहमीच पाकिस्तानी कलाकार, पाकिस्तानी सिनेमा आणि भारत-पाक क्रिकेट सामन्यांना कडवा विरोध करत असते.आताही पाकिस्तानी सिनेमा द लिजेंड ऑफ मौला जट्टवरून मनसेनं विरोधाची तलवार उपसलीय. त्यामुळे, हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित झालाच तर त्यावरून वादाचं खळखट्याक होण्याची शक्यता आहे.