‘केस नं. 73’च्या मोशन पोस्टरमुळे उत्सुकता शिगेला; नव्या वर्षात चक्रावून टाकणार हा मराठी रहस्यपट
प्रत्येक प्रेक्षक या कथेत स्वतःचं वेगळं सत्य शोधेल.” तर निर्मात्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील रहस्यपटांचा दर्जा आणखी उंचावण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Marathi Movie: प्रत्येक माणूस समाजात वावरताना एक मुखवटा घालून जगत असतो. या मुखवट्यामागे दडलेले असतात सुख-दुःख, वेदना, असुरक्षितता आणि अनेक गडद रहस्य. बाहेरून दिसणारा चेहरा आणि आत दडलेला खरा चेहरा यातील दरी जेव्हा समोर येते, तेव्हा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. अशाच धक्कादायक आणि विचारांना चक्रावून टाकणाऱ्या कथेसह मराठी चित्रपट ‘केस नं. 73’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
“ना चेहरा, ना निमित्त… चार खून, शून्य पुरावे…” या गूढ टॅगलाईनसह नुकतेच प्रदर्शित झालेले या चित्रपटाचे मोशन पोस्टर अनेक प्रश्न निर्माण करते. कोण आहे खुनी? चार खून का आणि कसे झाले? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, पुरावे नसतानाही सत्यापर्यंत पोहोचणं शक्य आहे का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रवास म्हणजे ‘केस नं. 73’. (Case no 73) लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज यांच्या बॅनरखाली तयार झालेला हा चित्रपट नवीन वर्षात, जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केले असून निर्मितीची धुरा शर्वरी सतीश वटक आणि डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी सांभाळली आहे. सहनिर्माते म्हणून प्रविण अरुण खंगार यांचे योगदान आहे.
रहस्यपटांचा दर्जा उंचावण्याचा विश्वास
चित्रपटात अशोक शिंदे, राजसी भावे, शैलेश दातार, नंदिता पाटकर आणि पियुष आपटे अशी दमदार कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे. प्रत्येक प्रसंगात नवं गूढ उलगडतं आणि मिळालेल्या प्रत्येक उत्तरामागे आणखी खोल प्रश्न उभे राहतात, ही या चित्रपटाची खासियत आहे.दिग्दर्शक डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांच्या मते, “‘केस नं. 73’ हा केवळ रहस्यमय चित्रपट नसून प्रेक्षकांच्या विचारांना आव्हान देणारी कथा आहे. प्रत्येक प्रेक्षक या कथेत स्वतःचं वेगळं सत्य शोधेल.” तर निर्मात्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील रहस्यपटांचा दर्जा आणखी उंचावण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
चित्रपटाची पटकथा डॉ. ऋचा अमित येनुरकर यांची असून गीतलेखन मंदार चोळकर यांनी केले आहे. संगीत आणि पार्श्वसंगीत अमेय मोहन कडू यांचे आहे, तर छायांकनाची जबाबदारी निनाद गोसावी यांनी सांभाळली आहे. रहस्य, थरार आणि अनपेक्षित वळणांनी भरलेला ‘केस नं. 73’ अखेर कोणाच्या चेहऱ्यावरचा मुखवटा काढणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरणार आहे.























