Mile Sur Mera Tumhara : दूरदर्शनवरील सर्वात लोकप्रिय गाणे कसे तयार झाले? वाचा 'मिले सूर मेरा तुम्हारा' गीताच्या निर्मितीची भन्नाट कथा
35 Years Mile Sur Mera Tumhara: तब्बल 14 भारतीय भाषांमध्ये बनलेल्या 'मिले सूर मेरा तुम्हारा' या गीताला 35 वर्षे पूर्ण झाली आहेत.
मुंबई: भारत आपला 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असून भारताची एकता आणि एकात्मता ही अतूट अशीच आहे. ही एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत, संगीत हा त्याचपैकी एक. भारताच्या एकतेचे अखंड दर्शन घडवणाऱ्या 'मिले सूर मेरा तुम्हारा' या गीताला आता 35 वर्षे पूर्ण झाली आहेत. तब्बल 14 भाषा आणि अनेक देशभरातल्या कलाकारांच्या सहभागाने तयार झालेल्या या गीताच्या निर्मितीचाही किस्सा भन्नाट होता. दूरदर्शनवरील सर्वात लोकप्रिय गीताचा मान या गीताला जातो.
15 ऑगस्ट 1988 रोजी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण झाल्यानंतर दूरदर्शनने सर्वप्रथम 'मिले सूर मेरा तुम्हारा... तो सूर बने हमारा' हे गीत सादर केलं केलं होतं. या गीताच्या निर्मितीची कहाणी अतिशय रंजक आहे. 1988 मध्ये बनलेल्या या गाण्यात अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती आणि जितेंद्र यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी सहभाग घेतला होता.
35 Years Mile Sur Mera Tumhara: अनेकांशी पत्रव्यवहार... अनेकांना ट्रंक कॉल
सुरेश मलिक आणि जाहिरात चित्रपट निर्माते कैलाश सुरेंद्रनाथ यांची या गाण्याची संकल्पना होती. दिग्दर्शनाची धुरा कैलास सुरेंद्रनाथ यांच्या हाती सोपवण्यात आली होती. देशातील तरुणांना अभिमान वाटेल असं गीत निर्माण करण्याचे निर्देश या दोघांना देण्यात आले होते. त्यासाठी या दोघांनी अनेकांना पत्रं लिहिली, अनेकांशी ट्रंक कॉलच्या माध्यमातून संपर्क केला. सतत महिनाभर हे दोघे याच गीतावर काम करत होते.
इकॉनॉमिक्स टाईम्सच्या एका वृत्तामध्ये या गीताच्या निर्मितीविषयी कैलाश सुरेंद्रनाथ यांनी सांगितलं. ते म्हणाले की, त्या काळात सगळ्या जाहिराती 14 भाषांमध्ये डब केल्या जायच्या. भाषा खूप महत्त्वाची असते हे तिथून कळले. गाणे तयार करण्यासाठी एक आठवडा लागला. त्यानंतर पंडित भीमसेन जोशी (Pandit Bhimsen Joshi) यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी त्यांचा तानपुरा, हार्मोनियम आणि तबला स्टुडिओत आणला आणि गाण्याचे रेकॉर्डिंग सुरू केले. हे गाणे तुकड्यांमध्ये रेकॉर्ड केले गेले. हे गाणे हिंदीत लिहिले गेले होते, ज्याचे नंतर अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले. त्या काळी फक्त इंडियन एअरलाईन्स असायची. त्या फ्लाईटच्या माध्यमातून आम्ही देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात जाऊन एका महिन्यात गाणे शूट केले. शूटिंगबाबत योजना असायची, पण अनेकदा लोकेशन पाहून काय करता येईल ते ठरवायचे.
हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर आपण ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणच्या लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आपल्याला सर्वजण ओळखू लागल्याचं पंडित भीमसेन जोशींनी सांगितल्याचं कैलाश सुरेंद्रनाथ म्हणाले.
लता मंगेशकर यांच्यासोबत गाण्याचे शेवटचे शूटिंग
या गाण्याच्या निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात गाणकोकीळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) जोडल्या गेल्या. गायिका कविता कृष्णमूर्ती यांनी या गाण्याचा एक तुकडा गायला होता. लता मंगेशकरांना या गाण्याची निर्मिती होत असल्याची माहिती मिळताच त्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये पोहोचल्या आणि कविता कृष्णमूर्तींनी गायलेला तुकडा स्वतःच्या शैलीत गाणं गायलं. ही संधी सोडायची नाही असंच लतादीदींनी ठरवलं होतं असं कैलाश सुरेंद्रनाथ सांगतात.
कविता कृष्णमूर्ती नाराज झाल्या
कविता कृष्णमूर्तींच्या गाण्याचा तुकडा लतादीदींनी गायल्याने कविता कृष्णमूर्ती नाराज झाल्या. हेमा मालिनी, शर्मिला टागोर, वहिदा रहमान यांच्यासाठी लतादींदींनी आवाज दिला आणि कविता कृष्णमूर्तींचा आवाज शबाना आझमी यांच्यासाठी ठेवण्यात आला.
अमिताभ, जितेंद्र आणि मिथुन स्वतःचे कपडे घेऊन आले
या गाण्यात त्यावेळचे सुपरस्टार अमिताभ बच्चन, जितेंद्र आणि मिथुन चक्रवर्ती यांना एकाच फ्रेममध्ये आणण्याचा किस्साही तसाच भन्नाट आहे. सुरुवातीला या तिघांच्या मॅनेंजरकडून शूटिंगसाठी तारखाच मिळत नव्हत्या. मग त्या कशाबशा मिळाल्या.
मेहबूब स्टुडिओच्या बागेत शूटिंग होतं. हे तिघेही सकाळी 7.30 वाजता शूटिंगसाठी हजर झाले. या तिघांनीही एकमेकांना विचारून त्यांचे-त्यांचे कपडे आणले होते. त्यांना गाण्याच्या ओळी देण्यात आल्या. तिघांनीही 10 मिनिटांत शॉट ओके केला आणि आपापल्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी निघून गेले.
मिले सूर मेरा तुम्हारा गीत 14 भाषांमध्ये
हे गाणं भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये नमूद करण्यात आलेल्या 14 भारतीय भाषांमध्ये चित्रित करण्यात आलं होतं. आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मिरी, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, सिंधी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांचे बोल या गाण्यात आहेत.
गायक आणि संगीतकार:
पंडित भीमसेन जोशी, विद्वान श्री एम बालमुरलीकृष्ण, लता मंगेशकर, कविता कृष्णमूर्ती, शुभांगी बोस, सुचित्रा मित्रा, आरए राम मणी, आनंद शंकर.
कवी:
नीरेंद्रनाथ चक्रवर्ती, सुनील गंगोपाध्याय, जावेद अख्तर.
अभिनेते:
अमिताभ बच्चन, जितेंद्र, मिथुन चक्रवर्ती, शर्मिला टागोर, हेमा मालिनी, तनुजा, कमल हसन, मीनाक्षी शेषाद्री, सायरा बानू, रेवती, केआर विजया, वहिदा रेहमान, शबाना आझमी, दीपा साही, ओम पुरी, भीष्म साही, भीष्म साही. दिना पाठक, हरीश पटेल, वीरेंद्र सक्सेना, उत्तम मोहंती, प्रताप पोथेन, गीतांजली.
क्रिकेटपटू: नरेंद्र हिरवाणी, अरुण लाल, डायना एडूलजी.
फुटबॉलपटू: प्रदीप कुमार बॅनर्जी, चुनी गोस्वामी.
हॉकीपटू: लेस्ली क्लॉडियस, गुरबक्स सिंग.
बॅडमिंटनपटू: प्रकाश पदुकोण.
बास्केटबॉल-खेळाडू: गुलाम अब्बास मुंतसीर.
नृत्यांगना: सुधराणी रघुपती, अमला शंकर, मल्लिका साराभाई, सत्यनारायण राजू.
इतर: व्यंगचित्रकार मारियो मिरांडा, चित्रपट निर्माते मृणाल सेन, वास्तुविशारद कल्पना कुट्टय्या, वाहनचालक जगत नांजप्पा, टेलिव्हिजन होस्ट अवि रामनन
ही बातमी वाचा: