Major Teaser: पाहा शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या शौर्यगाथेची एक झलक
कलाविश्वात आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारे चित्रपट साकारण्यात आले आहे. यातच आता आणखी एका चित्रपटाची भर पडत आहे.
मुंबई : कलाविश्वात आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारे चित्रपट साकारण्यात आले आहे. यातच आता आणखी एका चित्रपटाची भर पडत आहे. हा चित्रपट आहे, एका अशा व्यक्तीबद्दल, ज्यानं देशसेवेसाठी आपले प्राणही पणाला लावले.
26/11 हा दिवस संपूर्ण देश विसरुच शकत नाही. या दिवशी मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरचे काही दिवस धुमसणाऱ्या मुंबईनं खुप काही हिरावताना पाहिलं. यातच हिरावला गेला देशसेवेसाठी तत्पर असणारा भारतमातेचा एक सुपूत्र. मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना या हल्ल्यात दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण आलं. त्यांच्याच जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकत या सुपूत्राला अनोख्या पद्धतीनं सलामी देण्यासाठी साकारला गेला आहे चित्रपट मेजर.
नुकतंच अभिनेता सलमान खान, यानं या चित्रपटाचा टीझर लाँच केला. हिंदी, तेलुगू आणि मल्याळम अशा तीन भाषांमध्ये या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आणि सोशल मीडियावर त्याविषयीच्याच चर्चा सुरु झाल्या. अदिवी शेष या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारत असून, मेजर यांची भूमिका साकारत आहे.
2 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोरोनाचं संकट पाहता आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार की, तोपर्यंत परिस्थिती सुधारुन थेट चित्रपटगृहांच्याच माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखवण्यात आलेली दृश्य पाहता बालपणापासून मेजर होण्यापर्यंतचा संदीप उन्नीकृष्णन यांचा प्रवास, त्यांचं खासगी आयुष्य आणि एक व्यक्ती म्हणून ते नेमके कसे होते याबाबतचे अनेक पैलू टीपल्याचं लक्षात येतं.
Isse kehte hain dhamakedaar teaser! Really happy and proud to launch this. Congratulations to the team.. and salute to Major Sandeep Unnikrishnan. #MajorTeaserhttps://t.co/oWPL628l7q@AdiviSesh @sobhitaD @saieemmanjrekar @sonypicsfilmsin @sonypicsindia @GMBents
— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 12, 2021
शशी किरण यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटात प्रकाश राज, शोभिता धुलिपाला, सई मांजरेकर हे चेहरेही दिसणार आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू या चित्रपटाची निर्मिती करत आहे.