Kantara Chapter 1 Box Office Collection: 'कांतारा: चॅप्टर 1'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, सातच दिवसांत दणादण छापल्यात नोटा, 300 कोटी पार कमाई
Kantara Chapter 1 Box Office Collection: 'कांतारा: चॅप्टर 1'वर प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तसेच, बॉक्स ऑफिस 'कांतारा: चॅप्टर 1'च्या ताब्यात गेल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.

Kantara Chapter 1 Box Office Collection: ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) 'कांतारा: चॅप्टर 1' (Kantara Chapter 1) सध्या बॉक्स ऑफिस (Box Office) गाजवत आहे. पहिल्या दिवसापासूनच या सिनेमानं बॉक्स ऑफिसवरची (Box Office) आपली पकड मजबूत केली आहे. कमाईच्या बाबतीत बोलायचं झालं तर, सिनेमा कोटींच्या कोटी उड्डाण घेत आहे. रिलीज झाल्यानंतरच्या एका आठवड्यातच 'कांतारा: चॅप्टर 1'नं भारतात मोठी कमाई केली आहे. आता, ऋषभ शेट्टी यांच्या कन्नड चित्रपटानं कलेक्शनच्या बाबतीत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 'कांतारा: चॅप्टर 1'नं आतापर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली? सविस्तर जाणून घेऊयात...
'कांतारा: चॅप्टर 1'वर प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तसेच, बॉक्स ऑफिस 'कांतारा: चॅप्टर 1'च्या ताब्यात गेल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, फक्त एकाच आठवड्यात सिनेमानं 300 कोटींचा आकडा ओलांडला आहे. ट्रेड वेबसाईट सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, 'कांतारा: चॅप्टर 1'नं बुधवारी, सातव्या दिवशी भारतात 25 कोटींची कमाई केली आहे. ज्यामुळे सिनेमाची देशातील एकूण कमाईचा आकडा 316 कोटींवर पोहोचला आहे.
सर्वाधिक कमाई करणारी दुसरी फिल्म
'कांतारा: चॅप्टर 1'नं गुरुवारी म्हणजेच, रिलीजच्या पहिल्या दिवशी 61.45 कोटींची ओपनिंग केलेली. तर, दुसऱ्या दिवशी 45.4 कोटींची कमाई केलेली. शनिवारी 55 कोटी आणि रविवारी 63 कोटींचं कलेक्शन केलेलं. यानंतर सोमवारी 31.5 कोटी आणि मंगळवारी 34.25 कोटींचा गल्ला जमवला होता. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, पहिल्या दिवसापासूनच 'कांतारा: चॅप्टर 1' दुहेरी आकड्यात कमाई करत आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा कन्नड सिनेमा बनला आहे. तर यशचा 'केजीएफ: चॅप्टर 2' पहिल्या स्थानावर आहे.
'कांतारा: चॅप्टर 1'नं मोडलाय 'कांतारा'चाच रेकॉर्ड
'कांतारा: चॅप्टर 1' बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात भारतात 300 कोटींचा टप्पा ओलांडून या सिनेमानं इतिहास रचला आहे. सात दिवसांत 316 कोटींचं कलेक्शन करुन सिनेमानं 2022 मध्ये आलेल्या 'कांतारा' (309.64 कोटी)चा देशातील लाईफटाईम कलेक्शनलाही मागे टाकलंय.
दरम्यान, 'कांतारा: चॅप्टर 1' या सिनेमाचं लेखन ऋषभ शेट्टी यांनी केलंय, तसेच सिनेमाचं दिग्दर्शनही त्यानंच केलंय. सिनेमात त्यानं बर्मे नावाच्या आदिवासी तरुणाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मिती विजय किरागंडूर आणि चालुवे गौडा यांनी होंबळे फिल्म्स अंतर्गत केली आहे. या चित्रपटात जयराम, रुक्मिणी वसंत आणि गुलशन देवैया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.























