Firaq Gorakhpuri: जेव्हा मीना कुमारी यांना पाहताच फिराक गोरखपुरी यांनी मुशायरा सोडला, वाचा काय आहे किस्सा...
Firaq Gorakhpuri: फिराक गोरखपुरी हे गालिब आणि मीर यांच्यानंतरचे सर्वात मोठे शायर होते, असं प्रसिद्ध गीतकार आणि शायर निदा फाजली म्हणाले होते.
मौत का भी इलाज हो शायद
ज़िंदगी का कोई इलाज नहीं
मृत्यूवरही इलाज असू शकतो,
आयुष्याला इलाज नाही.
प्रसिद्ध उर्दू भाषेतील शायर फिराक गोरखपुरी यांनी लिहिलेल्या या ओळी जीवनातील त्रास आणि जगण्याच्या संघर्षाबद्दल बरच काही सांगून जातात. फिराक यांच्या शायरीचा अर्थ समजणे हे फारच कठीण आहे, असं बोललं जात. फिराक साहेब मुशायऱ्यात शायरी वाचताना मनातील व्यथा मांडतानाच समाजातील कटू वास्तव कधी सांगून जायचे याचा अंदाज येत नव्हता. फिराक हे गालिब आणि मीर यांच्यानंतरचे सर्वात मोठे शायर होते, असं प्रसिद्ध गीतकार आणि शायर निदा फाजली म्हणाले होते. फिराक हे खूप रागीष्ट स्वभावाचे होते. फिराक गोरखपुरी यांना मुशायरांची खूप आवड होती. मात्र त्यांनी एकदा चक्क रागाच्या भरात मुशायरा सोडला. याचं कारण ठरल्या त्या म्हणजे अभिनेत्री मीना कुमारी.
हा किस्सा 1959 किंवा 1960 मधील असल्याचे सांगण्यात येते. जेव्हा फिराक यांना मुशायऱ्यासाठी बोलावण्यात आले होते. फिराक यांचे खरे नाव 'रघुपती सहाय' होते. 'फिराक गोरखपुरी: द पोएट ऑफ पेन अँड एक्स्टसी' या पुस्तकात या घटनेचा उल्लेख आहे. फिराक यांच्या या चरित्रात्मक पुस्तकाचे लेखन अजय मानसिंग यांनी केलं आहे. जे फिराक यांचे नातेवाईक आहेत.
फिराक या मुशायराला पोहोचल्यावर टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत झाले आणि मुशायरा पूर्ण उत्साहात सुरुवात झाला. सुमारे तासाभरानंतर अभिनेत्री मीना कुमारी या देखील हा मुशायरा ऐकण्यासाठी कार्यक्रमस्थळी दाखल झाल्या. मीना कुमारी या देखील हा मुशायरा ऐकण्यासाठी येथे आल्या आहेत, असं कळल्यानंतर मुशायरा ऐकण्यासाठी आलेले बरेच लोक मुशायरा सोडून त्यांना पाहण्यासाठी धावाधाव करू लागले. यामुळे फिराक यांना संताप अनावर झाला. संपातलेल्या फिराक यांनी मुशायरा सोडून जाण्याचा निर्णय घेतला. ते मुशायरा सोडून निघालेच होते की, आयोजकांनी त्यांना विनंती करून थांबण्याचा खूप प्रयत्न केला.
फिराक मुशायरा सोडून जात असल्याचे कळताच मीना कुमारी यांनी देखील त्यांना थांबण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाल्या, ''फिराक साहेब, मी खास तुम्हाला ऐकण्यासाठी म्हणून येथे आली आहे.'' यावर ते म्हणाले, ''मुशायरा आता मुजरा झाला आहे. अशा मैफिलीशी माझा काही संबंध नाही.'' यानंतर फिराक तेथून निघून गेले. यानंतरच्या दुसऱ्या दिवशी ते म्हणाले, ''मी मीना कुमारी यांच्यामुळे मुशायरा सोडला नाही. मी आमचा अपमान करणाऱ्या आयोजक आणि प्रेक्षकांच्या वागणुकीमुळे हा मुशायरा सोडला. मुशायरा हे कवितेचे व्यासपीठ आहे. इथले कलाकार फक्त कवी आहेत.''