Cannes Film Festival : ‘धुईन’ ते 'गोदावरी', यंदाच्या ‘कान्स’ सोहळ्यात ‘हे’ भारतीय चित्रपट सामील!
Cannes Film Festival : 'रॉकेटरी-द नंबी इफेक्ट’चा प्रीमियर पॅलेसमध्ये होईल, तर उर्वरित चित्रपट ऑलिंपिया थिएटरमध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत.
Cannes Film Festival : सर्वांच्या नजरा सध्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022'कडे (Cannes Film Festival 2022) लागल्या आहेत. भारताची मान उंचवण्यासाठी अनेक सेलिब्रिटी रेड कार्पेट उतरणार आहेत. तर, हिंदी, मराठीसह काही निवडक भाषांमधील चित्रपट या महोत्सवात दाखवले जाणार आहेत. कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरू होण्यापूर्वी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या महोत्सवात प्रसिद्ध अभिनेते आर. माधवन याच्या 'रॉकेटरी-द नंबी इफेक्ट' या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे.
'रॉकेटरी-द नंबी इफेक्ट’चा प्रीमियर पॅलेसमध्ये होईल, तर उर्वरित चित्रपट ऑलिंपिया थिएटरमध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत. या महोत्सवात एकूण 6 भारतीय चित्रपट दाखवले जाणार आहेत.
रॉकेटरी - द नंबी इफेक्ट
आर. माधवन स्वतः 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता आहे. नंबी नारायणन यांच्या जीवनाची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. देशाच्या हितात विशेष योगदानकर्त्यांना ओळखण्याची आणि त्यांचा सन्मान करण्याची जबाबदारी घेण्याचे आव्हान हा चित्रपट प्रेक्षकांना देतो. हा चित्रपट हिंदी, इंग्रजी आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता.
गोदावरी
'गोदावरी' चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले आहे. तर, चित्रपटाचे निर्माते ब्लू ड्रॉप फिल्म्स प्रा. लिमिटेड आहे. 'गोदावरी' ही निशिकांतची कथा आहे, जो आपल्या कुटुंबापासून दूर झाला आहे. मुळात अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी आणि कधीही न तुटलेली नाती सुधारण्यासाठी तो पुन्हा घरी येतो. त्याच्या आयुष्यातील, कुटुंबातील गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे त्याला 'त्या' नदीजवळ मिळणार आहेत, ज्या नदीचा त्यानं इतकी वर्षं तिरस्कार केला.
अल्फा बीटा गामा
'अल्फा बीटा गामा' या चित्रपटाचे दिग्दर्शन शंकर श्रीकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा तीन लोकांभोवती फिरते, जे कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान फ्लॅटमध्ये अडकले आहेत. यादरम्यान, काळाबरोबर तिघांसाठी समीकरणे बदलतात आणि या काळात निर्माण झालेल्या नवीन परिस्थितींवर हा चित्रपट भाष्य करतो.
बुम्बा राइड
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'बुम्बा राइड' हा चित्रपटही दाखवला जाणार आहे. विश्वजित बोरा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची कथा एका गरीब शाळेभोवती भोवती फिरते, ज्यामध्ये फक्त एकच विद्यार्थी ‘बुम्बा’ असतो.
धुईन
अचल मिश्रा दिग्दर्शित ‘धुईन’ हा हिंदी, मराठी चित्रपट एका महत्त्वाकांक्षी अभिनेत्याची कथा आहे, जो पथनाट्ये करून आपला उदरनिर्वाह करत आहे. ते मोठे करण्याचे त्याचे स्वप्न आहे आणि त्याचा मित्र प्रशांत सोबत महिनाभरात मुंबईला जाण्याइतकी बचत करत आहे. लॉकडाऊननंतर त्याचे कुटुंब आर्थिक ताणाखाली आहे आणि त्याचे निवृत्त वडील आता नोकरीच्या शोधात आहेत.
ट्री फुल ऑफ पॅरोट्स
'ट्री फुल ऑफ पॅरोट्स' या चित्रपटाचे दिग्दर्शन जयराज यांनी केले आहे. यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट दाखवला जाणार आहे. या मल्याळम चित्रपटाची कथा दमदार आहे. या चित्रपटाची कथा पूजन या 8 वर्षांच्या मुलाभोवती फिरते.
संबंधित बातम्या
- Cannes festival 2022 : कान्स चित्रपट महोत्सवात सत्यजित रे यांच्या 'या' सिनेमाचे होणार विशेष स्क्रीनिंग
- Marathi Films in CFF 2022 : 'कारखानीसांची वारी'सह तीन मराठी चित्रपट परदेशवारीवर, मानाच्या 'कान्स' महोत्सवात निवड
- Cannes 2022: हॉलीवूडच्या दिग्गजांसोबत दीपिका पदुकोण ज्युरी मेंबर्सच्या लिस्टमध्ये सामील!