Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंवरील संघर्षयोद्धा सिनेमातील भूमिकेवर छगन भुजबळांची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाले 'मला त्यावर...'
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी संघर्षयोद्धा सिनेमातील त्यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
Chhagan Bhujbal : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर आधारित संघर्षयोद्धा या सिनेमात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची देखील भूमिका आहे. आता या सगळ्यावर छनग भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांच्या ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीला छगन भुजबळ यांनी विरोध केला. त्याचवेळी राज्यातील ओबीसी नेत्यांनी ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध करण्यासाठी राज्यभरात सभा देखील घेतल्या. त्यामध्येही भुजबळांनी केलेलं भाषण चांगलच गाजलं. मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात प्रचंड वादविवाद झाले होते. उभय नेत्यांनी एकमेकांवर खालच्या पातळीला जाऊन टीका केली होती. साहजिकच यामुळे चित्रपटात छगन भुजबळ यांचे पात्र काहीसे नकारात्मक पद्धतीने रंगवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय.
दरम्यान सिनेमात देखील भुजबळांच्या भाषणाचा भाग दाखवण्यात आला आहे. परस्परांवर टीकास्त्र हे वैयक्तिक आणि खालच्या पातळीवर जाऊ लागलं होतं. पण तरीही ओबीसीतूनच आरक्षण घेण्यावर मनोज जरांगे आणि ओबीसीतून आरक्षण न देण्यावर छगन भुजबळ ठाम आहेत. हाच संघर्ष या सिनेमातूनही दाखवण्यात आला आहे.
छगन भुजबळ यांनी काय म्हटलं?
संघर्षयोद्धा या सिनेमावर प्रश्न विचारला असता भुजबळांनी म्हटलं की, मला त्यावर काहीही बोलायचं नाहीये. त्यांना काय दाखवायचं ते दाखवू दे. त्यामुळे सिनेमातील भूमिकेवर भुजबळांनी प्रतिक्रिया देणं टाळल्याचं पाहायला मिळालं.
सिनेमात छगन भुजबळांची भूमिका
पण या चित्रपटात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या भूमिका कोण करणार? याची कमालीची उत्सुकता अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना लागून राहिली होती. या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये छगन भुजबळ यांची भूमिका अभिनेते संजय कुलकर्णी, तर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका शिवाजी दोलताडे यांनी साकारली आहे.
मनोज जरांगेंच्या भूमिकेत रोहन पाटील
या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.