TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
'वाय' चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
मुक्ता बर्वेने (Mukta Barve) हातात मशाल धरलेले 'वाय' या चित्रपटाचे आगळेवेगळे असे पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आले. मशाल घेऊन नक्की ती कोणासोबत लढत आहे याचे विविध अंदाज अजूनही लावले जात आहेत. आता 'वाय' चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित 'वाय' 24 जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
चित्रपटसृष्टीला ग्रहण; कोलकातामध्ये आणखी एका मॉडेलनं संपवलं आयुष्य
कोलकाता चित्रपटसृष्टीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मॉडेल आणि अभिनेत्री यांच्या आत्महत्येंच्या प्रकरणांमुळे खळबळ माजली आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये जवळपास तीन अभिनेत्रींने आत्महत्या केली आहे. नुकतीच मॉडेल आणि मेक-अप आर्टिस्ट असणाऱ्या सरस्वती दासनं आत्महत्या केली आहे. 18 वर्षाच्या सरस्वतीनं पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे. ही घटना कोलकाता येथील कस्बामध्ये घडली आहे.
हृता दुर्गुळेने शेअर केले 'अनन्या'चे पोस्टर
बहुचर्चित अनन्या हा सिनेमा आता 22 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेत्री हृता दुर्गुळे अनन्या हे पात्र साकारत आहे. हा सिनेमा आधी 11 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण नंतर या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली. आता हृताने सोशल मीडियावर या सिनेमाचे नवे पोस्टर शेअर करत सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात 'इरगाल'ने पटकावला पुरस्कार!
दिल्लीत झालेल्या बाराव्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात रशीद उस्मान निंबाळकर दिग्दर्शित 'इरगाल' चित्रपटाला बेस्ट फिल्म ज्युरी अॅवॉर्डचा मानकरी ठरला. महोत्सवातील 718 चित्रपटांतून ‘इरगाल’ चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला असून, महाराष्ट्रातील मरिआई या दुर्लक्षित जमातीवर हा चित्रपट बेतला आहे. आता लवकरच हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
टॉम क्रूझच्या 'Top Gun Maverick' सिनेमाने अमेरिकेत विकेंडला केली 1129 कोटींची कमाई
टॉम क्रूझचा 'टॉप गन मॅव्हरिक' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमाने अमेरिकेत विकेंडला 1129 कोटींची कमाई केली आहे.
'सरसेनापती हंबीरराव'ची बॉक्स ऑफिसवर विक्रमी सुरुवात; तीन दिवसांत रचला इतिहास
प्रविण तरडेंचा 'सरसेनापती हंबीरराव' या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत या सिनेमाने 8.71 कोटींची कमाई केली आहे.
'धर्मवीर'ने केली 22.58 कोटींची कमाई
महाराष्ट्रात सध्या 'धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे' या सिनेमाचाच बोलबाला आहे. 13 मे रोजी हा सिनेमा तब्बल चारशेहुन अधिक सिनेमागृहे आणि 10 हजारांहून अधिक शोजसह हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने हाऊसफुल्लचे बोर्ड अभिमानाने झळकवले आहेत. आतापर्यंत या सिनेमाने 22.58 कोटींची कमाई केली आहे.
'भूल भुलैया 2'ची उत्तुंग भरारी; दुसऱ्या विकेंडलाही कमवला कोट्यवधींचा गल्ला
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' हा सिनेमा प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर रिलीजच्या दुसऱ्या विकेंडला या सिनेमाने 30 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
फुलेरा नाही तर मध्य प्रदेशमधील 'या' गावामध्ये झालं पंचायत-2 चे शूटिंग
काही दिवसांपूर्वी पंचायत सीरिजचा दुसरा सिझन प्रदर्शित झाला. सारिजचे कथानक, कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शन या सर्व गोष्टींना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. पंचायतच्या पहिल्या सिझनला जेवढी लोकप्रियता मिळाली तेवढीच लोकप्रियता मिळत आहे. या सीरिजमध्ये यूपीमधील बलिया जिल्ह्यातील फुलेरा गावाचे कथानक दाखवण्यात आलं आहे. पण पंचायत 1 आणि पंचायत 2 या दोन्ही भागांचे शूटिंग हे सिहोरमधील महोदिया या गावामध्ये करण्यात आलेलं आहे.
'सम्राट पृथ्वीराज' सिनेमाचा नवा ट्रेलर रिलीज
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित 'सम्राट पृथ्वीराज' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात अक्षय कुमार पृ्थ्वीराज चौहान यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या सिनेमाचे नाव बदलण्यात आले आहे. आता सिनेमाचे नाव बदलल्यानंतर निर्मात्यांनी या सिनेमाचा नवा ट्रेलर रिलीज केला आहे.