(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Saath Sobat: 'साथ सोबत'चं पहिलं पोस्टर लाँच; चित्रपट या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस
'साथ सोबत' (Saath Sobat) हा नवा कोरा चित्रपट 13 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Saath Sobat: चित्रपटांच्या भाऊगर्दीत काही चित्रपट आपली एक वेगळी ओळख जपण्यात यशस्वी होत असतात. प्रदर्शनापूर्वीच पुरस्कारांवर आपलं नाव कोरून रसिकांसोबतच समीक्षकांचंही लक्ष वेधून घेतात. यापैकी काही मोजके चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता जागवतात. याच वाटेवरील 'साथ सोबत' हा नवा कोरा चित्रपट 13 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'साथ सोबत' (Saath Sobat) या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचं नुकतंच अनावरण करण्यात आलं.
प्रसन्न वैद्य यांची प्रस्तुती असलेल्या 'साथ सोबत' या चित्रपटाची निर्मिती धनजी मारू यांनी मारू एन्टरप्रायझेस या बॅनरखाली केली आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन रमेश मोरे यांनी केलं आहे. दिग्दर्शक रमेश मोरे यांनी आजवर लेखक-दिग्दर्शकाच्या रूपात 18 चित्रपट बनवले असून, तीन चित्रपटांची निर्मितीही केली आहे. 2004 मध्ये 'अकल्पित' या चित्रपटापासून लेखक-दिग्दर्शक म्हणून सुरू झालेला मोरे यांचा प्रवास आज 'साथ सोबत' या चित्रपटापर्यंत येऊन पोहोचला आहे. मोरे यांच्या चित्रपटांनी देश-विदेशांमधील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवत बरेच पुरस्कारही आपल्या नावे केले आहेत. त्यांच्या "चॅम्पियन्स' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकार हे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
आयुष्याच्या संध्याकाळी 'साथ सोबत' पुरवणाऱ्या सवंगड्यांची कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. हा चित्रपट जगण्याची एक नवी दृष्टी प्रदान करणारा आहे. यात एक प्रेमकथाही आहे आणि एक सशक्त संदेशही आहे. कथेच्या प्रवाहाशी एकरूप होणाऱ्या गीतरचना आणि त्यांना जोडलेली सुमधूर संगीताची किनार असा मनोरंजनासाठी लागणारा सर्व प्रकारचा मसालाही यात आहे, त्यामुळं 'साथ सोबत'च्या रूपात कमर्शिअल व्हॅल्यू असलेला, पण अत्यंत साधेपणानं आपलं म्हणणं मांडणारा चित्रपट प्रेक्षकांना अनुभवता येईल.
राजदत्त, मोहन जोशी, अनिल गवस, संग्राम समेळ, अमोल रेडीज, दिलीप आसुर्डेकर आदी कलाकारांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. मृणाल कुलकर्णी ही नवोदित अभिनेत्री या चित्रपटातून पदार्पण करीत आहे. डिओपी हर्षल कंटक यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली आहे. यशश्री मोरे यांनी लिहिलेल्या गीतरचनांना संगीतकार महेश नाईक यांनी स्वरसाज चढवला आहे. पार्श्वसंगीतही महेश नाईक यांनी दिलं असून, अभिषेक म्हसकर यांनी या चित्रपटाचं संकलन केलं आहे. वेशभूषा यशश्री मोरे यांची असून, रंगभूषा संतोष चारी आणि सतिश भावसार यांची आहे. कला दिग्दर्शन प्रकाश कांबळेंनी केलं असून, नृत्ये व केशभूषा मीनल घाग यांची आहे. कौशिक मारू आणि यशश्री मोरे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: