एक्स्प्लोर
...म्हणून रिंकूच्या 'कागर'साठी आणखी वाट पाहावी लागणार!
दोन वर्षांनंतर रिंकूचा चित्रपट येत असल्याने 'कागर'विषयी प्रचंड उत्सुकता आणि चर्चा आहे.

मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री रिंकू राजगुरुची प्रमुख भूमिका असलेल्या 'कागर' या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, आता फॅन्सना अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण रिंकूची बारावीची परीक्षा असल्याने व्हॅलेंटाईन्स डेच्या मुहूर्तावर 'कागर' प्रदर्शित होणार नाही. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या 'उदाहरणार्थ' या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी 'कागर'चं दिग्दर्शन केलं आहे. वडील-मुलाच्या नात्यावर आधारित 'रिंगण' आणि चार शाळकरी मुलांची गोष्ट असलेला 'यंग्राड' हे दोन चित्रपट मकरंदने यापूर्वी दिग्दर्शित केले होते. 'रिंगण' आणि 'यंग्राड' हे दोन्ही चित्रपट भिन्न पद्धतीचे होते. त्यामुळे आता 'कागर' या चित्रपटाविषयी नावापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. मूळचे अकलूजचे असलेले आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले मकरंद आणि रिंकू या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. 'व्हॅलेंटाईन्स डे'ला रिंकूचा नवा चित्रपट प्रदर्शित होणार दोन वर्षांनंतर रिंकूचा चित्रपट येत असल्याने 'कागर'विषयी प्रचंड उत्सुकता आणि चर्चा आहे. "14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने 'कागर' प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, फेब्रुवारीमध्येच रिंकूची बारावीची परीक्षा असल्याने चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्मात्यांनी निर्णय घेतला आहे," असं निर्माते विकास हांडे आणि सुधार कोलते यांनी स्पष्ट केलं. "मला स्वतःला 'कागर'विषयी प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने चाहत्यांना भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार होती. मात्र, बारावीची परीक्षा असल्याने मला अभ्यासाला वेळ देणे आवश्यक आहे, हे निर्मात्यांनी लक्षात घेतलं आणि 14 फेब्रुवारीला माझ्यासाठी चित्रपट प्रदर्शित करायचा नाही, असं ठरवलं. त्यासाठी मला त्यांचे आभार मानावेसे वाटतात. पण आत्ता चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं असलं, तरी लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल," असं रिंकूने सांगितलं.
आणखी वाचा























