एक्स्प्लोर
एसआयटीकडून अक्षय कुमारची दोन तास चौकशी, 42 प्रश्नांचा भडिमार
एसआयटीने दोन तासांच्या चौकशीत अक्षयला राम रहीम आणि सुखबीर सिंह बादल यांच्या बैठकीबाबत प्रश्न विचारले
चंदीगड : शिखांच्या पवित्र धर्मग्रंथाचा अपमान आणि कोटकपुरा तसंच बेहबलकला गोळीबाराची चौकशी करणाऱ्या एसआयटीने आज बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची चंदीगडमध्ये चौकशी केली. सुमारे दोन तासांच्या चौकशीत एसआयटीने अक्षय कुमारवर 42 प्रश्नांचा भडिमार केला. गुरमीत राम रहीम आणि सुखबीर सिंह बादल यांच्यासोबत बैठक, शिखांच्या धर्मग्रंथाच्या अपमानासह अनेक प्रश्न अक्षय कुमारला विचारण्यात आले. दरम्यान, अक्षय कुमारने एसआयटीचे हे आरोप फेटाळले आहेत.
कोटकपुरा पोलिसात या प्रकरणात माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बाद, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल आणि अक्षय कुमार यांना समन्स जारी करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायमूर्ती रणजीत सिंह आयोगाच्या अहवालात अभिनेता अक्षय कुमारवर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहे. या आरोपांनुसार, अक्षयने 20 सप्टेंबर 2015 रोजी त्याच्या फ्लॅटवर तत्कालीन उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल आणि डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम यांची बैठक घडवून आणली होती. या बैठकीतच गुरमीत राम रहीम याचा चित्रपट पंजाबमध्ये प्रदर्शित करण्यावर शिक्कामोर्तब झालं होतं.
एसआयटीने दोन तासांच्या चौकशीत अक्षयला राम रहीम आणि सुखबीर बादल यांच्या बैठकीबाबत प्रश्न विचारले. सूत्रांच्या माहितीनुसार अक्षयने सगळे आरोप फेटाळत, आपल्याला या प्रकरणात उगाचच ओढलं जात असल्याचं म्हटलं आहे. "माझ्यावर खोटे आरोप लावले जात आहेत. मला माहित नाही माझं नाव का घेतलं जात आहे. मी शिखांच्या धर्मग्रंथाचा अपमान केलेला नाही," असं अक्षयने एसआयटीसमोर सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ऑक्टोबर 2015 मध्ये गुरु ग्रंथ साहिबचा अपमान आणि आंदोलकांनवर गोळीबार केल्याप्रकरणी कॅप्टन अमरिंदर सरकारने एसआयटीची स्थापना केली होती. त्यावेळी राज्यात अकाली दल-भाजप युतीचं सरकार होतं आणि प्रकाश सिंह बादल मुख्यमंत्री होते. फरीदकोट जिल्ह्याच्या कोटकपुरामधील बेहबलकला गावात पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला होता.
एसआयटीने अक्षयला आज (21 नोव्हेंबर) अमृतसरऐवजी चंदीगडमध्ये हजर राहण्याचा पर्याय दिला होता. पंजाब पोलिसांच्या एसआयटीने याआधी अक्षयला 21 नोव्हेंबर रोजी अमृतसर सर्किट हाऊसमध्ये बोलावलं होतं. एसआयटीने अक्षयसह पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल आणि शिरोमणी अकाली दलचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनाही बोलावलं होतं. एसआयटीने प्रकाश सिंह बादल आणि त्यांचे पुत्र सुखबीर सिंह बादल यांची सोमवारीच चंदीगडमध्ये चौकशी केली होती. "पंजाबच्या बाहेर अक्षयला कधीही भेटलो नाही," असं सुखबीर सिंह बादल यांनी चौकशीत एसआयटीला सांगितलं. तर गुरमीत राम रहीम सध्या बलात्काराच्या दोन प्रकरणात 20 वर्षांचा कारावास भोगत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement