Priyanka Chopra : संयुक्त राष्ट्र महासभेत प्रियांका चोप्राचं भाषण; म्हणाली ‘जगात सर्वकाही ठीक चाललेलं नाही!’
Priyanka Chopra : नुकतीच प्रियांकाने संयुक्त राष्ट्र महासभेला (United Nations General Assembly) हजेरी लावली होती. यावेळी तिने सभेला संबोधित केले.
Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) अशा कलाकारांपैकी एक आहे, जे केवळ त्यांच्या झगमगाटी आयुष्यासाठी नाही तर सामाजिक कार्यातील सहभागासाठीही ओळखले जातात. प्रियांका चोप्रा देखील जगभरात समाज कार्य करत असते. नुकतीच प्रियांकाने संयुक्त राष्ट्र महासभेला (United Nations General Assembly) हजेरी लावली होती. यावेळी तिने सभेला संबोधित केले. सध्या या सभेतून प्रियांकाचे फोटो आणि व्हिडीओ चर्चेत आले आहेत. यावेळी प्रियांकाने ‘जगात सर्वकाही ठीक चाललेलं नाही’ असं म्हणत अनेक सामाजिक समस्यांवर भाष्य केले.
या सभेत प्रियांकाने मलाला युसुफझाई आणि अमांडा गोरमन या जागतिक नेत्यांसोबत भाषण केले. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याविषयी माहिती दिली आहे. प्रियांका चोप्रा 2016 मध्ये युनिसेफची ग्लोबल सदिच्छा दूत बनली. या संस्थेसोबत ती गेली अनेक वर्ष काम करत आहे. नुकत्याच पार पडलेल्या या सभेतील काही फोटो आणि व्हिडीओ प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. तसेच, यात सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल तिने कृतज्ञता देखील व्यक्त केली आहे.
मुलींच्या शिक्षणावर केलं भाष्य..
या संबोधनात प्रियांका (Priyanka Chopra) म्हणाली की, ‘मी भारतात लहानाची मोठी झाले, जिथे जगातील इतर अनेक भागांप्रमाणेच मुलींना शिक्षण मिळणे हे एक आव्हान आहे. मुलींना शिकायचे आहे, पण तसे करण्याची ताकद त्यांच्यात नाही, त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. मला वाटतं की, शिक्षण हा समता, सामाजिक न्याय, सामाजिक परिवर्तन आणि लोकशाहीचा आधार आहे.’
आपल्या जगात सर्व काही ठीक नाहीय...
प्रियांका पुढे म्हणाली की, 'आज आपलं जग एका अशा वळणावर आहे, जिथे जागतिक एकता पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. कोविड-19 साथीच्या रोगाच्या विनाशकारी परिणामांशी देश सतत लढत असताना, हवामान बदलाच्या संकटामुळे जीवन आणि उपजीविकेचा नाश होत असताना, संघर्ष, क्रोध, गरिबी, उपासमार आणि असमानता या न्याय्य जगाचा पाया नष्ट करत आहेत. आपण इतके दिवस लढत आहोत आणि आपल्या सर्वांना माहित आहे की, आपल्या जगात सर्व काही ठीक नाहीय. ही संकटे योगायोगाने आली असली तरी, काही योजना आखून ती दूर करता येतील. आपण सगळे त्यासाठी प्रयत्न करू.’
प्रियांकाचे आगामी प्रोजेक्ट्स
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, प्रियांकाची ‘सिटाडेल’ ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील अभिनेता रिचर्ड मॅडन प्रमुख भूमिका साकारणार आहे. ‘सिटाडेल’ ही एक सायन्स फिक्शन सीरिज आहे. तसेच, प्रियांका ही ‘जी ले जरा’या चित्रपटामधून देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
वाचा इतर बातम्या: