स्त्रियांवरील अमानुष प्रथेवर भाष्य करणार 'परदा'; डॉ. आंबेडकरांच्या ‘त्या’ प्रसिद्ध खटल्याला लघुपट समर्पित
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा र. धों. कर्वे यांच्या ‘समाजस्वास्थ्य’साठीचा खटला हरूनही जिंकले होते. त्या हरलेल्या खटल्याला ‘परदा’ हा लघुपट समर्पित करण्यात आलेला आहे.
मुंबई : भारतातील काही समाजात चालत असलेल्या मुलींच्या खतना किंवा सुंता प्रथेवर भाष्य करणारा ‘परदा’ हा लघुचित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सातव्या किंवा आठव्या वर्षी लहान मुलींचा मदन ध्वज (clitoris) भूल न देता समाजातीलच वयस्कर स्त्रिया ब्लेडने कापतात. ज्यामुळे शारीरिक व मानसिक व्याधी पुढे होतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्त्रियांना कामपूर्ती देणारा अवयव कापून टाकला जाणे, हे अमानुष आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रघुनाथ धोंडो कर्व्यांच्या ‘समाजस्वास्थ’ मासिकाशी संबंधित खटल्यावर आधारित हा लघुचित्रपट असणार आहे.
काय होता ‘समाजस्वास्थ्य’चा खटला?
सन 1934 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक खटला लढला होता. रघुनाथ धोंडो कर्व्यांच्या ‘समाजस्वास्थ’ मासिकाविरुद्धचा ऐतिहासिक असा हा खटला होता. रघुनाथ धोंडो कर्वे हे त्यांनी सुरु केलेल्या कार्यामुळे विसाव्या शतकाच्या प्रारंभी रुढीवाद्यांच्या टिकेचे लक्ष्य झाले होते. त्यांनी असा विषय निवडला होता की चर्चा सुरु झाली होती. तो विषय होता लैंगिक ज्ञानाचा. कर्वे लैंगिक विषयावर बोलायचे, लिहायचे आणि आपले प्रश्न मांडायचे. विसाव्या शतकाच्या प्रारंभात ते आपले विचार मुक्तपणे मांडायचे. नैतिकतेच्या, अश्लीलतेच्या मुद्यांवर ते त्यांची नवी आणि आधुनिक भूमिका मांडत असत.
लैंगिक विषयांवर लिहिलेलं त्यांचं 'समाजस्वास्थ्य' हे मासिक सगळ्या बंधनांना झुगारत वैयक्तिक प्रश्नांना सार्वजनिकरित्या उत्तर देत असे. विखारी सामाजिक टीकेसोबतच न्यायालयीन लढायाही कर्व्यांच्या वाट्याला आल्या. ते त्या लढाया एकांड्या शिलेदारासारखे लढत राहिले. पण त्याला अपवाद एकच... डॉ. बाबासाहेब आंबेडकर. डॉ. आंबेडकर हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते.
“स्त्रियांनाही उन्मुक्त सेक्सचा आनंद मिळायला हवा. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही लैंगिक समानता मिळायला हवी" असे अनेक विचार समाजस्वास्थ्य मासिकातून प्रा. र. धों. कर्वेंनी मांडले. बंद मेंदूचा समाज यौन विषय हा अश्लील ठरवून विकृत रूढी वाहण्याचे काम करतो. त्यामुळे समाज स्वास्थ्याचे नुकसान होते. खटल्यादरम्यान बाबासाहेबांनी लैंगिक समानता व स्त्री यौन मुक्तीच्या बाजूने मांडलेले मुद्दे आज संवैधानिक स्तरावर लागू करणे अत्यंत गरजेचे आहेत. परंतु अजूनही कौमार्य चाचणी, मुलींची खतना वगैरे अनेक विकृत रूढी समाजात सुरु आहेत.
र. धों. कर्वे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लढलेल्या स्त्री यौन मुक्तीच्या लढ्याला, स्त्रियांच्या खतन्यावर भाष्य करणारा 'परदा' हा लघुपट तयार करण्य़ात आला आहे. अमर देवकर यांनी या लघुपटाची निर्मिती केली असून हा लघुपट डॉ. बाबासाहेबांच्या या अत्यंत महत्वाच्या खटल्याला समर्पित करण्यात आलेला आहे.
मेंदूवरील अनेक पडदे काढणारा हा हिंदी भाषेतील लघुपट 'परदा'
'परदा' या चित्रपटाचं छायाचित्रण गिरीश रा. जांभळीकर यांनी केलंय. संकलक सौमित्र धारासुरकर तर कार्यकारी निर्माता काकासाहेब शिंदे आहेत. निर्मिती ध्वनी संयोजक आकाश छाया लक्ष्मण, साउंड डिझायनर डॉ. समीर सुमन, आकाश छाया लक्ष्मण आणि कला दिग्दर्शन अतुल लोखंडे यांनी केले आहे. पार्श्वसंगीत डॉ. जयभिम शिंदे यांनी दिले आहे. निर्मिती व्यवस्थापक अक्षय होळकर तर निर्मिती चेतन देवकर यांची आहे. रंगभूषा सुरेश कुंभार, वेशभूषा अमृता चिद्रींनी केले आहे. या चित्रपटाचं सहाय्यक दिग्दर्शन विक्रम बोळेगावे यांनी केलं आहे. छायाचित्रण सहाय्यक म्हणून कैलास गव्हाणे, सुशील शर्मा आहेत. समाधान सर्वगोड यांनी कला सहाय्यक तर ध्वनी सहाय्यक विकी मोरे, नितीन जमादार, अक्षरलेखन आणि प्रसिद्धी संतोष येसालेंनी केलंय. तर या लघुपटात शाश्वती खन्ना आणि अमर देवकर यांनी अभिनय केला आहे. महिलांच्या जिव्हाळ्याचा अत्य़ंत संवेदनशील विषय या लघुपटात सुंदररित्या हाताळला आहे. काहींच्या मेंदूवरील अनेक पडदे उघडण्याची अपेक्षा घेऊन हा लघुपट लवकरच चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे..
या आधी सुंता किंवा खतना या विषयावर ‘द कट’ नावाचं नाटकही पुण्यातील विद्यार्थ्यांनी सादर केले होते. ‘एबीपी माझा’ने या विषयावर रिपोर्ताज केला होता.
महत्त्वाच्या बातम्या :
- Sushmita Sen : सुष्मिता सेनचा ब्रेकअप; रिलेशनशिप संपलं, मित्र म्हणून कायम राहणार, सोशल मीडियावर केलं जाहीर
- 83 Premiere: 83 चा भव्य प्रीमियर; रणवीर सिंह आणि कपिल देव यांनी होस्ट केला कार्यक्रम
- Sarsenapati Hambirrao : प्रविण तरडेंच्या 'सरसेनापती हंबीरराव'ची 'बाहुबली'ला उत्सुकता; प्रभासने केला टीझर शेअर