Mukesh Chhabra on Struggling Actors : मयतीला गेलो तरी लोक काम मागतात, नवख्या कलाकारांमुळे कास्टिंग डायरेक्टर हैराण
Mukesh Chhabra on Struggling Actors : मुकेश छाबरा यांनी नुकतेच लेखक निलेश मिश्रा यांच्यासोबत संवाद साधला. स्ट्रगलर्स कलाकारांनी काम मागणे चुकीचे नाही. पण, ते इतका त्रास देतात की मी हैराण होतो.
Mukesh Chhabra on Struggling Actors : सिनेसृष्टीत काम करण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते. चित्रपटात ब्रेक मिळावा यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. दिग्दर्शक, कलाकार, कास्टिंग डायरेक्टर यांची भेटगाठ घेण्यासाठी अनेकजण धडपडत असतात.काहींना यश मिळते. तर, काहींचा स्ट्रगल सुरुच राहतो. मात्र, नवखे कलाकार हे ज्या ठिकाणी काम मागायला नको अशा ठिकाणीदेखील कामासाठी आर्जव करतात.
बॉलिवूडचे प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. मुकेश यांनी सांगितले की, स्ट्रगलर कलाकार हे काम मागण्यासाठी माझ्याकडे येतात. मात्र, काही जण हे अशा ठिकाणीही गाठतात, ज्या ठिकाणी कास्टिंगबाबत बोलणे योग्यच नसते.
स्ट्रगलर्स कलाकारांवर काय म्हणाले मुकेश छाबरा?
मुकेश छाबरा यांनी नुकतेच लेखक निलेश मिश्रा यांच्यासोबत संवाद साधला. स्ट्रगलर्स कलाकारांनी काम मागणे चुकीचे नाही. पण, ते इतका त्रास देतात की मीच हैराण होतो. खूप लोकांना अभिनेता होण्याची इच्छा असते. त्यासाठी ही मंडळी कोणत्याही परिस्थितीत कोणतीही संधी सोडत नाही, असे छाबरा सांगतात.
त्यांनी पुढे उदाहरण देताना सांगितले की, 'एकदा मी एका ज्येष्ठ अभिनेत्याच्या अंत्यविधीला गेलो होतो. यावेळी अनेक कलाकार उपस्थित होते. मी असे का म्हणत आहे हे मला माहित नाही पण काही लोक अशा ठिकाणी फक्त संपर्क साधण्यासाठी येतात. मला अशा गोष्टी समजत नाहीत.
रील करून काय अभिनेता होणार?
मुकेश छाबरा पुढे म्हणाले, 'जर तुम्ही संघर्ष करत असाल, तुमची मेहनत त्याच पातळीवर होत असेल, तर मी त्याचा आदर करतो. तुम्ही कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही, तुम्ही काहीही शिकले नाही, परंतु तुम्ही ज्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहात ते मला समजले आहे आणि कदाचित मी त्याबद्दल विचारही करू शकतो. हे निराशाजनक वाटते की तुम्ही कोणत्याही आनंदी ठिकाणी किंवा दुःखाच्या ठिकाणी फक्त संपर्क साधण्यासाठीच येता.
मुकेश छाबरा यांनी पुढे म्हटले की,'ही पिढी खूप वेगळी आहे. ही लोक त्यांच्या कामापेक्षा सोशल मीडियावर जास्त लक्ष केंद्रित करत आहेत. मी राजकुमार रावचा संघर्ष पाहिला आहे, विकी कौशलची मेहनतही पाहिली आहे. आजची तरुणाई रील बनवण्याविषयी बोलतात आणि इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी काहीही करतात. मात्र, अशा प्रकारे कोणीही यशस्वी अभिनेता होऊ शकत नाही.
43 वर्षीय मुकेश छाबरा यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले आहे. त्याच्या चित्रपटांमध्ये 'गँग्स ऑफ वासेपूर', 'दिल बेचारा', 'दंगल', 'जवान', 'बजरंगी भाईजान', 'पीके', 'छिछोरे', 'काय पो छे' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे.