National Cinema Day : राष्ट्रीय चित्रपट दिनी थिएटर हाऊसफुल! 75 रुपयांच्या तिकीटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
National Cinema Day : नुकताच देशभरात ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ साजरा करण्यात आला. या खास निमित्ताने कोणताही चित्रपट अवघ्या 75 रुपयांत प्रेक्षकांना पाहता आला आहे.
National Cinema Day : नुकताच देशभरात ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ (National Cinema Day) साजरा करण्यात आला. या खास निमित्ताने कोणताही चित्रपट अवघ्या 75 रुपयांत प्रेक्षकांना पाहता आला आहे. अवघ्या 75 रुपयांच्या तिकीटावर चित्रपट पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांनी देखील चांगलीच गर्दी केली होती. या दिवशी जवळपास सगळे थिएटर हाऊसफुल झाले होते. तिकीट दर कमी असल्याने चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. राष्ट्रीय चित्रपट दिनाचं निमित्त साधत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
23 सप्टेंबर रोजी देशभरात ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ साजरा करण्यात आला. राष्ट्रीय चित्रपट दिनाचे निमित्त साधत देशभरात अवघ्या 75 रुपयांमध्ये प्रेक्षकांना चित्रपटांचा आस्वाद घेता आला. तिकीटाचे दर कमी असल्याने चित्रपटगृहांमध्ये चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. तब्बल 65 लाखांहून अधिक लोकांनी या दिवशी मनोरंजनाचा आस्वाद घेतला आहे. मात्र, आता यावरून देखील अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
थिएटर झाले हाऊसफुल!
मल्टीप्लेक्स ऑफ इंडियानं (MAI) 23 सप्टेंबर रोजी ‘राष्ट्रीय चित्रपट दिनाचं निमित्त साधत सगळे चित्रपट 75 रुपयांमध्ये पाहता येणार असल्याची घोषणा केली होती. पीवीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, कार्निवल, मिराज आणि सिटी प्राइड, एशियन, मुक्ता ए 2, मूवीटाइम, वेव, एम 2 के आणि डिलाइट या देशभरातील मल्टीप्लेक्समध्ये 'राष्ट्रीय चित्रपट दिनी' हा उपक्रम राबवण्यात आला होता. या दिवशी तब्बल 65 लाखांहून अधिक लोकांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याचा आनंद लुटला.
मनोरंजन महाग झालंय का?
कोरोना काळानंतर प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे पाठ फिरवली होती. मात्र, या निमित्ताने पुन्हा एकदा हाऊसफुल गर्दी पाहायला मिळाली. तिकिटाचे दर कमी केल्यानंतर वाढलेली प्रेक्षकांची गर्दी पाहता मनोरंजन महाग झालंय का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अभिनेता आणि निर्माता हेमंत ढोमे यानेही एक पोस्ट करून असाच सवाल उपस्थित केला होता. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, ‘आज राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या निमित्ताने चित्रपटगृहांनी 75 रु. असा सवलतीचा तिकीट दर लावल्यानंतर प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली आहे. सगळीकडे मराठी सिनेमा हाऊसफुल्ल! म्हणजे तिकीट दर कमी असतील तर प्रेक्षक गर्दी करू शकतात? प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का?’ केवळ हेमंत ढोमेच नाही तर, चित्रपट व्यवसाय विश्लेषक तराण आदर्श यांनीही मनोरंजन विश्वाला एक इशारा दिला आहे.
तरण आदर्श यांनी देखील या संदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘राष्ट्रीय चित्रपट दिनी चित्रपटांना मिळालेला उदंड प्रतिसाद हा चित्रपट वितरक, स्टुडिओ आणि प्रदर्शक यांच्यासाठी एक धडा आहे. यामुळे तिकीटांच्या कमी दराचं महत्त्व अधोरेखित झालं आहे. आता वेळ आली की, तिकीटांच्या दरावर पुन्हा विचार करण्याची..’
संबंधित बातम्या