Milind Safai Passed Away : 'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी
Milind Safai : अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन झाले आहे.
Milind Safai : मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेते मिलिंद सफई (Milind Safai) यांचे निधन झाले आहे. आज (25 ऑगस्ट 2023) सकाळी 10.45 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे.
मिलिंद सफई यांनी कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यांच्यावर उपचारदेखील सुरू होते. पण कर्करोगाशी सुरू असलेली त्यांची झुंज आज अखेर संपली आहे. ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर (Jaywant Wadkar) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मिलिंद सफई यांच्या निधनाची बातमी चाहत्यांना दिली आहे. जयवंत वाडकर यांनी मिलिंद यांचा एक फोटो शेअर करत लिहिलं आहे,"अभिनेते मिलिंद सफई यांचं कॅन्सरने निधन...भावपूर्ण श्रद्धांजली".
मिलिंद सफई यांच्याबद्दल जाणून घ्या... (Who Is Milind Safai)
मिलिंद सफई हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते होते. मालिकांसह अनेक सिनेमांतदेखील त्यांनी काम केलं आहे. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत ते महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. या मालिकेत त्यांनी अरुंधतीच्या वडिलांची भूमिका साकारली होती.
मिलिंद सफई यांनी छोटा पडद्यावर कार करण्यासोबत रुपेरी पडदादेखील गाजवला आहे. प्रेमाची गोष्ट, लकडाऊन, पोस्टर बॉईज, मेकअप अशा अनेक मराठी सिनेमांत ते महत्त्वाच्या भूमिकेत होते. 'आई कुठे काय करते' या मालिकेसह 'सांग तू आहेस का?', '100 डेज' या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं आहे. तसेच 'पुढचं पाऊल' या मालिकेतही ते महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत.
मिलिंद सफई यांच्या निधनानंतर सहकलाकारांसह चाहते आणि सेलिब्रिटीदेखील शोक व्यक्त करत आहेत. मिलिंद यांनी मालिकांमध्ये अनेकदा वडिलांची भूमिका साकारली आहे. त्यामुळे मालिकेतला बाप हरपला असं म्हणत चाहते शोक व्यक्त करत आहेत. चाहत्यांसह नेटकरी त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.
मिलिंद यांनी मालिका आणि सिनेमांसह अनेक नाटकांमध्येही काम केलं आहे. तरुण पिढीतील हौशी कलाकारांना ते नेहमीच मार्गदर्शन करत असे. आता त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
गेल्या काही दिवसांत मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींचं निधन झालं आहे. जयंत सावरकर, नितीन देसाई, सीमा देव यांचे निधन झाले आहे.
संबंधित बातम्या