Kangana Ranaut : ‘केवळ दांडी यात्रेने स्वातंत्र्य नाही मिळालं...’, ‘कर्तव्यपथा’च्या उद्घाटनाला कंगनाचं वक्तव्य!
Kangana Ranaut : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवारी देशाची राजधानी दिल्ली येथील ‘कर्तव्यपथा’चे (Kartavyapath) उद्घाटन केले.
Kangana Ranaut : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवारी देशाची राजधानी दिल्ली येथील ‘कर्तव्यपथा’चे (Kartavyapath) उद्घाटन केले. या उद्घाटन कार्यक्रमात देशातील अनेक नेते, कलाकार आणि सेलिब्रिटी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतही (Kangana Ranaut) सामील झाली होती. या कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी कंगनाने मीडियाशी संवाद साधला. यावेळी कंगनाने अनेक वक्तव्ये केली.
अभिनेत्री कंगना रनौत म्हणाली की, 'मी हे नेहमीच म्हणत आलेय आणि आजही म्हणेन की, आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेय ते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि वीर सावरकरांसारख्या अनेक क्रांतिकारकांमुळे शक्य झाले आहे. हे स्वातंत्र्य आपल्याला मागून मिळालेले नाही, तर अनेक लढ्यांतून स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. प्रत्येकाची स्वतःची विचार करण्याची पद्धत आहे आणि मला वाटते की, नेताजी आणि सावरकरजींसारख्या इतर अनेक क्रांतिकारकांचा संघर्ष पूर्णपणे नाकारला गेला आहे. केवळ उपोषण आणि दांडी यात्रा करून आपण स्वातंत्र्य मिळवले हीच बाजू दाखवण्यात आली. पण, तसं नाहीये.’
नेताजींना स्वातंत्र्याची भूक होती!
कंगना म्हणाली की. ‘स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी बलिदान दिले. नेताजींनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला आणि भारताची भीषण परिस्थिती समोर आणण्यासाठी जगभर मोहीम चालवली. त्यांनी एक सैन्य तुकडीही तयार केली होती आणि ब्रिटीशांवर अशा प्रकारे दबाव आणण्यात सक्रिय सहभाग घेतला. ते सत्तेचा भुकेले नव्हता. त्यांना स्वातंत्र्याची भूक होती आणि त्यांनी देश स्वतंत्र केला.’
तर, या ‘कर्तव्यपथ’ नामकरण करण्याबद्दल बोलताना कंगना म्हणाली, ‘हा कर्तव्याचा मार्ग आहे, येणाऱ्या अनेक पिढ्या त्यावर चालतील. हाच कर्तव्याचा मार्ग, हाच मार्गदर्शनाच मार्ग असेल.'
मी गांधीवादी नाही : कंगना रनौत
एका प्रश्नाचे उत्तर देताना कंगना म्हणाली की, 'मी नेताजींबद्दल नेहमीच स्पष्टपणे बोलते. मी नेहमीच म्हणत आलेय की, मी गांधीवादी नाही, मी नेताजी सुभाष चंद्रवादी आहे. मी त्या लोकांपैकी एक आहे ज्यांचा, तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा यावर विश्वास आहे. आजचा दिवस ऐतिहासिक आहे आणि या दिवसासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. नेताजी आणि त्यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, असे मी नेहमीच म्हणत आले आहे. आम्हाला स्वातंत्र्य मागून मिळालेले नाही, आम्ही आमच्या हक्काचे स्वातंत्र्य मिळवले आहे.’
संबंधित बातम्या