दीपिकाची जेएनयूमध्ये उपस्थिती, धास्तावलेल्या कंपन्यांनी दोन आठवड्यांसाठी जाहिराती थांबवल्या
जवाहरलाल नेहरु विद्यापीठात 5 जानेवारी रोजी झालेल्या हिंसक हल्ल्यानंतर दीपिका आंदोलकांच्या भेटीसाठी जेएनयूमध्ये गेली होती.
मुंबई : जाहिराती आणि चित्रपटांमधून देशात सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण. तिला जाहिरात विश्वाची राणी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण ती जेव्हा जेएनयूच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सामील झाली, तेव्हा मात्र तिला जाहिरातीत घेणाऱ्या कंपन्यांनी कमालीची धास्ती घेतली आहे. अनेक ब्रॅण्ड्सनी दीपिकाच्या जाहिराती दोन आठवड्यांसाठी थांबवण्याचा किंवा कमी दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. दीपिका ब्रिटानियाची गुडडे, लॉरियल, तनिष्क, विस्तारा एअरलाईन्स आणि अॅक्सिस बँकेसह 23 ब्रॅण्ड्ससाठी जाहिराती करते. दीपिकाची मालत्त 103 कोटी रुपये आहे. एका सिनेमासाठी ती 10 कोटी रुपये तर जाहिरातीसाठी 8 कोटी रुपये घेते, असं म्हटलं जातं.
दीपिका पदुकोणच्या जाहिराती थांबवण्याच्या निर्णयाला कारण ठरलं आहे दीपिकाची दिल्लीतील जेएनयूमधील उपस्थिती. जवाहरलाल नेहरु विद्यापीठात 5 जानेवारी रोजी झालेल्या हिंसक हल्ल्यानंतर दीपिका आंदोलकांच्या भेटीसाठी जेएनयूमध्ये गेली होती. आपल्या 'छपाक' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तीन दिवसांआधी म्हणजेच 7 जानेवारी रोजी दीपिका जेएनयू कॅम्पसमध्ये गेली होती. गुंडांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोषची विचारपूस केली आणि काहीही न बोलता निघून गेली. आयषी घोषजवळ उभी राहिलेल्या दीपिकाचे अनेक फोटो समोर आले होते. यानंतर दीपिकाच्या भूमिकेचं, साहसाचं अनेकांनी कौतुक केलं. तर अनेक मंत्री, उजव्या विचारसरणीच्या ट्रोलर्सनी तिच्यावर निशाणा साधला होता.
ट्रोलर्सच्या निशाण्यावर दीपिका पदुकोण दीपिकाच्या मूक पाठिंब्यानंतर सोशल मीडियावर दीपिकाविरोधात ट्रोलर्सनी वादळ उठवलं. 'बॉयकॉट दीपिका', 'बॉयकॉट छपाक' असे हॅशटॅग ट्रेण्ड केले. टुकडे-टुकडे गँगची अम्बॅसेडर अशीही उपमा दिली. त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवरही दिसला. अजय देवगणच्या 'तानाजी' चित्रपटाच्या तुलनेत 'छपाक'ची कमाई कमी झाल्याचं दिसलं. 'तानाजी'ने 62 कोटी कमावले, तर 'छपाक'ने फक्त 19 कोटी रुपये.
ब्रॅण्ड्सचं म्हणणं काय? काही ब्रॅण्ड्सनी म्हटलं आहे की, "दीपिका असलेल्या आमच्या जाहिरातींचं प्रक्षेपण आम्ही कमी केलं आहे." तर दुसरीकडे कलाकारांचे एण्डॉर्समेंट सांभाळणाऱ्या मॅनेजरनी सांगितलं की, "आगामी काळात जाहिरातींच्या करारात अशाप्रकारच्या अटी आणि शर्ती जोडल्या जातील, ज्यात कोणत्याही कलाकाराच्या राजकीय भूमिकेमुळे प्रशासनाच्या रोषाच्या जोखीमेचा उल्लेख असेल." "सामान्यत: ब्रॅण्ड सावध पावलं टाकतात. त्यांना कोणत्याही प्रकारच्या वादात अडकायचं नसतं," असं आयपीजी मीडियाब्रॅण्ड्सचे सीईओ शशी सिन्हा यांनी म्हटलं.
'छपाक'ची कमाई 40 कोटींपेक्षा कमी 'छपाक'ने पहिल्या दोन दिवसात 11.67 कोटी रुपयांची कमाई केली होती. शुक्रवारी सिनेमाने 4.77 कोटी रुपये कमावले होते. तर शनिवारी हा आकडा वाढून 6.90 कोटी रुपयांवर गेला. तर रविवार चित्रपटाने 9 कोटी रुपये कमावले होते. या सिनेमाचा एकूण खर्च 40 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे.
आमीर, शाहरुखच्या जाहिरातीही बंद झाल्या होत्या! एखाद्या कलाकाराच्या जाहिराती थांबवण्याची किंवा कमी दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. असहिष्णुतेच्या मुद्द्यावरुन अभिनेता आमीर खानच्या जाहिरातीही बंद केल्या होत्या. स्नॅपडीलसारख्या कंपनीला आमीर खानच्या वादाचा सर्वात मोठा फटका बसला. तर 'माय नेम इज खान'च्या प्रदर्शनावेळी शाहरुख खानच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूला धक्का लागला होता. तेव्हाही कंपन्यांनी वादात अडकलेल्या प्रत्येक स्टारपासून फारकत घेतली पण जेव्हा प्रकरण थंड झालं, तेव्हा जाहिराती पुन्हा एकदा सुरु झाल्या. त्यामुळे ब्रॅण्ड आणि स्टार्स दोघेही सध्या वाद शमण्याची प्रतीक्षा करत आहेत.