Ideas of India Summit 2023 : "स्टार किड्सला सहज संधी मिळते"; बॉलिवूडच्या घराणेशाहीवर Ayushmann Khurrana चं वक्तव्य
Ideas Of India Summit 2023 : एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया' या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) सहभागी झाला होता.
Ideas Of India Summit 2023 : बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023' (Ideas Of India Summit 2023) या कार्यक्रमात सहभागी झाला होता. दरम्यान त्याने त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल भाष्य केले. तसेच बॉलिवूडचा 'अष्टपैलू अभिनेता' होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता हेदेखील सांगितले.
हिंदी सिनेसृष्टीत आयुष्मानने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला,"वेगवेगळे प्रयोग करायला मला आवडतं. त्यामुळे नेहमीच मी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे सिनेमे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पथनाट्य करायला मला आवडत असल्याने त्या पद्धतीचे समाजप्रबोधनपर चित्रपट मला आवडतं. वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे करताना अभिनेता म्हणून अनेक गोष्टी शिकायला मिळतात".
आयुष्मान खुराना म्हणाला,"तुमच्याकडे टॅलेंट असेल तर त्याचा योग्य वापर करा. प्रेक्षकांच्या आवडीचा विचार करा. दाक्षिणात्य सिनेमे पाहायला मला आवडतात. मल्याळम सिनेमे तुम्हाला विचार करायला भाग पाडतात. आता प्रेक्षक विभागला गेला आहे. काहींना ओटीटीवर सिनेमा पाहायला आवडतो तर काही सिनेप्रेमी सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहतात. त्यामुळे वर्षभरात फक्त चार सिनेमे सुपरहिट होतात. बॉलिवूडचे विषयच ओटीटीवर चालतात. त्यामुळे आता योग्य प्लॅटफॉर्म आणि त्या प्रेक्षकवर्गासाठी चांगल्या दर्जाच्या गोष्टींची निर्मिती करण्याची गरज आहे".
आऊटसायडरबद्दल बोलताना आयुष्मान खुराना म्हणाला,"पूर्वीच्या काळी बॉलिवूडमध्ये आऊटसायडरला किंमत नव्हती. स्टार किड्सला खूप सहज संधी मिळत होत्या. आजही काही ठिकाणी स्टार किड्सचा पहिला विचार केला जातो. पण दुसरीकडे गोष्टी बदललेल्या देखील आहेत. तुमच्याकडे टॅलेंट असेल तर बॉलिवूड तुमचं स्वागत करतं. कास्टिंग दिग्दर्शकांमुळे भूमिकेला योग्य न्याय देणाऱ्या दिग्दर्शकांची निवड केली जाते".
'अॅन अॅक्शन हीरो' का फ्लॉप झाला?
आयुष्मान खुराना म्हणाला,"अॅन अॅक्शन हीरो' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अॅक्शन हीरो म्हणून या सिनेमाच्या माध्यमातून मी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला आलो होतो. मला वाटतं या सिनेमाची वेळ चुकली, जर हा सिनेमा योग्यवेळी प्रेक्षकांच्या भेटीला आला असता तर बॉक्स ऑफिसवरदेखील या सिनेमाला सुगीचे दिवस आले असते".
एबीपी नेटवर्क 'आयडियाज ऑफ इंडिया'
एबीपी नेटवर्कच्या (ABP Network) 'आयडियाज ऑफ इंडिया' (ABP Ideas Of India) हा परिसंवाद 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये (Mumbai) पार पडतो आहे. यंदा या कार्यक्रमाचं दुसरं वर्ष असून यंदाची थीम 'नया इंडिया' (Naya India) आहे. या परिसंवादामध्ये एकाच व्यासपीठावर देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांसोबत संवाद साधला जाणार आहे.
संबंधित बातम्या