Ananya : 'शक्य आहे तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे'; हृता दुर्गुळेने शेअर केले 'अनन्या'चे पोस्टर
Ananya : 'अनन्या' हा सिनेमा 22 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृता दुर्गुळेने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे.
Ananya : बहुचर्चित अनन्या (Ananya) हा सिनेमा आता 22 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) अनन्या हे पात्र साकारत आहे. हा सिनेमा आधी 11 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण नंतर या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली. आता हृताने सोशल मीडियावर या सिनेमाचे नवे पोस्टर शेअर करत सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
हृता दुर्गुळेने शेअर केले 'अनन्या'चे पोस्टर
हृता दुर्गुळेने सिनेमाचे पोस्टर शेअर करत लिहिले आहे,"आपणच शोधायचं असतं कवेत घेता येईल असं आपलं स्वत:चं आकाश! अनन्या...'शक्य आहे तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे' अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे. हृता दुर्गुळे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाच्या पोस्टरमध्ये हृता खूपच धाडसी दिसत आहे.
एकांकिका, नाटक ते सिनेमा.. असा आहे 'अनन्या'चा प्रवास
अनन्या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता लागली होती. या सिनेमाच्या माध्यमातून हृता मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. रुईया महाविद्यालयाची 'अनन्या' एकांकिका प्रचंड गाजली होती. या एकांकिकेत स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर या एकांकिकेचे नाटकात रुपांतर करण्यात आले. नाटकात ऋतुजा बागवेने अनन्याचे पात्र साकारले होते. याआधी महिला दिनाच्या निमित्ताने 'अनन्या' सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते.
अनन्याचा जिद्दीचा प्रवास उलगडणार!
'अनन्या' सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप कड यांनी केले आहे. तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. नुकतेच आऊट झालेल्या सिनेमाच्या पोस्टरमध्ये धाडसी वृत्तीची अनन्या दिसत आहे. अनन्याचा जिद्दीचा प्रवास या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अनन्या सिनेमाविषयी हृता दुर्गुळे म्हणते,"आयुष्य खूप सुंदर आहे. ते मनमुराद जगावे. खूप उर्जा आणि सकारात्मकता देणारा हा सिनेमा आहे."
'अनन्या'च्या माध्यमातून करणार रुपेरी पडद्यावर पदार्पण
दुर्वा या मालिकेच्या माध्यमातून हृता दुर्गुळेने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. तर फुलपाखरू मालिकेने हृताला लोकप्रियता मिळाली. या मालिकेच्या माध्यमातून हृता घराघरांत पोहोचली. सध्या हृताच्या दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाचे रंगभूमीवर जोरदार प्रयोग होत आहेत. हृता आता अनन्या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे.
संबंधित बातम्या