Happy Birthday Paresh Rawal : विनोदीच नाही तर, खलनायक साकारुनही गाजवला मोठा पडदा! वाचा अभिनेते परेश रावल यांच्याबद्दल...
Paresh Rawal Birthday : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांचा आज (30 मे) वाढदिवस आहे. आज ते त्यांचा 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
Paresh Rawal Birthday : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांचा आज (30 मे) वाढदिवस आहे. आज ते त्यांचा 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत. अभिनेते परेश रावल यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर संपूर्ण जगात आपली ओळख निर्माण केली आहे. परेश रावल हे असे कलाकार आहेत, जे कोणत्याही भूमिकेत स्वत:ला अगदी फिट बसवतात. त्यांची हेरा फेरीतील ‘बाबूराव’ची व्यक्तिरेखा असो किंवा ओह माय गॉडमधील ‘कांजीभाई’, त्यांनी साकारलेल्या सर्वच व्यक्तिरेखा लोकांच्या मनात घर करून आहेत. केवळ विनोदी अभिनेता नाही तर, खलनायक बनूनही त्यांनी मोठा पडदा गाजवला.
परेश रावल यांचे शालेय शिक्षण मुंबईतील विलेपार्ले येथील नरसी मुंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून झाले. परेश रावल यांनी त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात करण्यापूर्वी नोकरीही केली होती. त्यांनी काही काळ बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी केली. वयाच्या 22 व्या वर्षी परेश मुंबईत आले आणि काम शोधण्यासाठी संघर्ष करू लागले.
हिंदी, गुजरातीच नव्हे, ‘या’ भाषांमध्येही केलेय काम
परेश रावल यांनी 1982 मध्ये 'नसीब नी बलिहारी' या गुजराती चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. याच दरम्यान 1984 मध्ये 'होली' या चित्रपटाने परेश रावल यांचा बॉलिवूडमध्ये डेब्यू झाला होता. या चित्रपटात परेश रावल यांनी सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर परेश रावल यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केले. परेश रावल यांनी गुजराती, हिंदी, तेलुगू, मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
खलनायक बनून गाजवला पडदा
परेश रावल यांनी ‘अंदाज अपना अपना’, ‘हेरा-फेरी’, ‘वेलकम’सारखे कॉमेडी चित्रपट करून लोकांना खूप हसवले. ‘अंदाज अपना अपना’, ‘छोटे मिया बडे मिया’ या चित्रपटात परेश रावल यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. खलनायक साकारतानाही त्यांनी लोकांना खळखळून हसवले. ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटातील तेजाची व्यक्तिरेखा आजही लोकांच्या स्मरणात आहे. केवला विनोदीच नाही तर, खलनायक बनून देखील त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.
अनेक पुरस्कारांवर कोरले नाव
परेश रावल यांना त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत सर्वोत्तम अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 1994 मध्ये 'सर' आणि 'वो छोकरी' या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. आणि 2014 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.
तब्बल 30 वर्ष रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे परेश रावल राजकारणातही सक्रिय आहेत. 2014-2019 पर्यंत ते अहमदाबादचे खासदार होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून, ती जिंकली होती. अभिनेता परेश रावल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे समर्थक देखील मानले जातात.
हेही वाचा :
PHOTO : ब्युटी इन ब्लॅक, कान्सच्या रेड कार्पेटवर तमन्ना भाटियाचा जलवा!
Sriya Lenka: ऑडिशन दिली, ऑनलाईन कोरियन भाषा शिकली, भारताची पहिली के-पॉप स्टार ठरली श्रिया लेंका!
Hrithik Roshan, KGF 3 : ‘केजीएफ 3’मध्ये हृतिक रोशनची वर्णी? वाचा काय म्हणाले मेकर्स...